ठाकरेंच्या पवारांसोबतच्या चर्चेनंतर निघाले बदल्यांचे आदेशमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबई पोलिस दलातील ९ उपायुक्तांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. त्या करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला मुंबई पोलिस आयुक्त परबीर सिंग आणि महासंचालक सुबोध जयस्वाल हजर होते.

बैठकीत राज्यातील इतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील पोलिस व सनदी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. सरकारने मध्यंतरी एक आदेश काढून यंदा केवळ १५ टक्के बदल्या करण्याचे धोरण आखले आहे. पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यातील शिवसेना आमदारांशी चर्चा केली. तसेच कोरोना उपाययोजनांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. यावेळी शिवसेना आमदारांनी आपली कामे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांकडून होत नसल्याची तक्रार केली.

बदल्यांमुळे राजकारण ढवळून निघाले

गेला आठवडाभर १० पोलिस उपायुक्तांच्या बदल्याने राज्याचे प्रशासन व राजकारण ढवळून निघाले होते. या बदल्यांवर आक्षेप घेतला, मग त्या रद्द केल्या आणि आज पुन्हा बदल्या केल्या. त्या अधिकाऱ्यांना त्याच नियुक्त्या द्यायच्या होत्या मग, हा गोंधळ का घातला, असा प्रश्न आघाडी सरकारला विचारला जातो आहे. दरम्यान, या एकूणच प्रकारामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेले मतभेद हे चव्हाट्यावर आल्याचे या निमित्ताने पहायला मिळते. आगामी काळात असे मतभेद पुन्हा होऊ नये, यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांनी पढाकार घेतला पाहिजे, असेही राजकीय जाणकारांना वाटते. मात्र, येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष सरकार टिकवण्यासाठी काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.

बदली केलेले उपायुक्त

परमजित सिंग दहिया - परीमंडळ ३, प्रशांत कदम - परीमंडळ ७, गणेश शिंदे - पोर्ट झोन ( बंदरे ), रश्मी करंदीकर - सायबर सेल, शहाजी उमप - विशेष शाखा १ , मोहन दहीकर - लोकल आर्मस ताडदेव, विशाल ठाकूर - परीमंडळ ११, प्रणय अशोक - परीमंडळ १, नंदकुमार ठाकूर - क्राईम ब्रांच ( डिटेंशन ).

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post