अभिनयातला 'मोठा माणूस' निळू फुलेमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कलाकार निळू फुले यांचा आज १३ जुलैला ११ वा स्मृतिदिन. 'पुढारी पाहिजे,' 'कथा अकलेच्या कांद्याची', 'राजकारण गेलं चुलीत', 'सोकाजीराव टांगमारे,' 'सूर्यास्त' या नाटकांनंतर त्यांनी एक गाव बारा भानगडी, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, थापाड्या, 'चोरीचा मामला', 'शापित', 'सामना', 'सिंहासन', 'पिंजरा' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केले. काही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटातीलही त्यांचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे.
निळू फुलेंच्‍या बोलण्यात एक लहजा होता. बोलण्‍याची लकब सगळ्‍यांत वेगळी असल्याने त्यांचा आवाज पटकन ओळखला जायचा. निळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला होता. त्‍यांचे वडील लोखंडी सामान व भाजीपाला विकत होते. त्‍यांचे दुकानही होते. निळूभाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.
निळू फुलेंना अभिनयाची आवड पहिल्‍यापासूनच होती. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्‍यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी 'येरागबाळ्याचे काम नोहे' या लोकनाट्‍यात पहिल्‍यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहिजे' या नाटकातून त्यांच्या 'रोंगे' या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्‍यातून त्‍यांना प्रसिध्‍दी मिळाली. तर सुर्यास्त या नाटकामुळे ते अधिक लोकप्रिय झाले.
रंगभूमीवर 'सूर्यास्त,' 'घरंदाज,' 'रण दोघांचे,' 'सखाराम बाईंडर,' 'जंगली कबुतर' आणि 'बेबी' ही त्यांची नाटके तर 'पुढारी पाहिजे,' 'कोणाचा कोणाला मेळ नाही,' 'कथा अकलेच्या कांद्याची,' 'लवंगी मिरची - कोल्हापूरची,' 'राजकारण गेलं चुलीत' ही त्‍यांची प्रमुख लोकनाट्ये गाजली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post