चीनला चार देशांनी हिंदी महासागरात घेरले


माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारत-चीन तणावादरम्यान अमेरिकेनेही दक्षिण चिनी समुद्रापासून हिंदी महासागरापर्यंत गस्तीमध्ये वाढ केली आहे. अमेरिकन नौदलाच्या ‘यूएसएस निमित्झ’ या विमानवाहू युद्धनौकेने दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या छाताडावर आपला एकाच महिन्यातील दुसरा युद्धाभ्यास संपवून भारतातील अंदमान-निकोबार द्विपसमूहाकडे कूच केली आहे. सध्या या भागात आधीच भारतीय नौदलाचा  युद्धाभ्यास सुरू आहे. अमेरिकेच्या आगमनाने आता हिंदी महासागरात चीनला घेरण्यासाठी 4 देश सज्ज झालेले आहेत.

भारताबरोबरच जपान आणि ऑस्ट्रेलिया आधीपासूनच या सागरी क्षेत्रात चीनला घेरण्यासाठी तत्पर आहेत. सध्या याच मार्गाने चीनचा बहुतांशी व्यापार चालतो. पेट्रोलियम पदार्थांची चीनची आयात-निर्यातही याच मार्गाने होते. चीनने युद्धाची आगळीक केली, तर या सर्व व्यापाराची नाकाबंदी होणार आहे. त्यामुळे चीनला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

हिंदी महासागरातील चीनच्या कुरापतखोरीला आवर घालण्यासाठी अमेरिकेने आपल्या 3 एअरक्राफ्ट कॅरिअर्स (विमानवाहू युद्धनौका) या भागात सज्ज ठेवल्या आहेत. सध्या यापैकी एक ‘यूएसएस रोनाल्ड रिगन’ दक्षिण चीन समुद्रात, तर ‘यूएएसएस थियोडोर रुझवेल्ट’ फिलिपाईन्सच्या हद्दीतील समुद्राच्या जवळपास पहारा देत आहे. अमेरिकेच्या या आक्रमक धोरणामुळे खवळलेला ड्रॅगन सतत युद्धाची धमक्या देत आहे.

‘यूएसएस निमित्झ’ची ताकद काय?

अमेरिकेच्या सुपर कॅरिअर्समधील ‘यूएसएस निमित्झ’ ही एक अत्यंत  शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे. अणुऊर्जेवर चालणारी ही विमानवाहू युद्धनौका 3 मे 1975 रोजी अमेरिकन नौदलात सहभागी झाली. ती ‘स्ट्राईक ग्रुप 11’मधील एक घटक असून, तिची संहारक क्षमता अद्वितीय आहे. 332 मीटर लांबीच्या या युद्धनौकेवर 90 लढाऊ विमाने तसेच हेलिकॉप्टर्सव्यतिरिक्त नौदलाचे 3,000 सैनिक सज्ज असतात.

‘निमित्झ’चे तेव्हाचे आणि आताचे निमित्त

‘निमित्झ’ अमेरिकेच्या सातव्या ताफ्यात असून, हा ताफा 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेला बंगालच्या उपसागरात आला होता. बांगला देशात मार खात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना मदत करणे हा या ताफ्याचा तेव्हा उद्देश होता. तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूने होता. अमेरिकेच्या या सातव्या ताफ्याला तेव्हा माघार घ्यावी लागली होती; पण आता ‘निमित्झ’ भारताच्या विरोधात नव्हे, तर भारताच्या बाजूने उभे राहण्यासाठी येत आहे. राजकारणाप्रमाणेच सामरिक क्षेत्रातही कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, ही बाब यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post