देशभरात १२ हजार पोलीस कोरोना संक्रमित
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना संक्रमणाच्या काळात पोलीस अगदी पहिल्या दिवसापासून रस्त्यावर आहेत. लॉकडाऊनमध्येही लोकांना आवरण्यासाठी पोलिसांना अहोरात्र रस्त्यावर राहावे लागले. पोलिसांच्या कामाचे स्वरूप पाहता फिजिकल डिस्टन्सिंग कठीणच असल्याने हॉस्पिटल, क्वारंटाईन सेंटर, कंटेन्मेंट झोनमधील तैनातीमुळे तसेच ट्रेसिंगच्या कामातही जुंपले गेल्याने पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून, इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार देशभरात 12 जुलैपर्यंत 12 हजार 887 पोलीस संक्रमित झाले आहेत. 105 जणांचा मृत्यूही झाला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक पोलिसांचे मृत्यू
महाराष्ट्रात सर्वाधिक 6 हजार पोलीस पॉझिटिव्ह आढळले असून, सर्वाधिक मृत्यूही याच राज्यात घडले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 5 हजार 935 पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 74 जणांचा मृत्यू झाला आहे. 600 कर्मचारी क्वारंटाईन आहेत.
महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक दिल्लीचा आहे. दिल्लीत 2 हजार 800 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
हल्ल्यात 275 जखमी
कोरोनाकाळात देशभरात ठिकठिकाणी झालेल्या हल्ल्यात 275 पोलीस जखमी झाले आहेत. यातही सर्वाधिक 86 महाराष्ट्रातील आहेत.
अन्य सुरक्षा दलांतूनही गंभीर स्थिती
पॅरा-मिल्ट्री फोर्सचे 5 हजारांहून अधिक जवान संक्रमित आहेत. सर्वाधिक संक्रमित बीएसएफचे आहेत. पॅरा-मिल्ट्री फोर्सचे 5 हजार 202 जवान कोरोना संक्रमित आढळले आहेत, 27 जवानांचा मृत्यू झाला आहे.
बीएसएफचे 1 हजार 659 जवान संक्रमित झालेले आहेत. 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सीआरपीएफचा क्रमांक असून, या दलाचे 1 हजार 594 जवान संक्रमित आढळले आहेत, तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
Post a Comment