बनावट परवाना घेऊन चालविले शिवभोजन केंद्र
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – अन्न व औषध प्रशासनाचे बनावट परवाने तयार करून शिवभोजन केंद्र सुरू केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री रमेश धायतडक, शरद बाळासाहेब मरकड व स्वप्निल जयसिंग निंबाळकर यांचा आरोपींमध्ये संमावेश आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शरद मरकड व स्वप्निल निंबाळकर या दोघांना अटक केली असून, त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता 17 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच हे केंद्र सुरू होते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी 2 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाला नव्याने मंजुरी दिलेल्या शिवभोजन केंद्रांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने सर्व शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन त्यांची तपासणी केली. ही तपासणी करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणार्या रेव्हेन्यू कॅण्टीन शिवभोजन केंद्र व चौपाटी कारंजा येथे असणार्या बळीराजा भोजनालय शिवभोजन केंद्र यांनी दाखवलेल्या अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्या. या प्रकरणी सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार 11 जून रोजी रेव्हेन्यू कॅन्टीन शिवभोजन केंद्र व 12 जून रोजी बळीराजा भोजनालय यांची सुनावणी अन्न व औषध प्रशासन विभागात झाली. सुनावणीमध्ये संबंधित केंद्रचालकांनी सादर केलेला अन्न व्यवसाय नोंदणी परवाना बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित केंद्र चालकांकडे विचारणा केली असता त्यांनी तो सावेडी भागात असणार्या तहसील कार्यालयासमोरील श्रीकृष्ण मल्टिसर्व्हिसेसचे स्वप्निल जयसिंग निंबाळकर यांनी दिल्याचे सांगितले.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सहायक आयुक्त संजय पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीचा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांनाही रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शासनाची फसवणूक केली
रेव्हेन्यू कॅण्टीन येथील शिवभोजन केंद्र चालविणार्या गायत्री रमेश धायतडक व चौपाटी कारंजा येथील बळीराजा भोजनालयात शिवभोजन केंद्र चालविणारे शरद बाळासाहेब मरकड यांनी शिवभोजन थाळी केंद्राचा बेकायदेशीर परवाना मिळविण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण मल्टिसर्व्हिसेसचे स्वप्निल जयसिंग निंबाळकर यांच्याकडून बनावट अन्न व्यवसाय परवाना तयार करून घेतला व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Post a Comment