‘रिस्क’ वाढली नागरिकांनो, आता तरी काळजी घ्या; … नाही तर पुन्हा ’लॉकडाऊन’



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अनलॉकचा टप्पा सुरू झाल्यापासून नगरमध्ये गर्दी वाढू लागली आहे. नगरमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अशा रेड झोनमधून येणार्‍यांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता नगर शहरातील रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे महापालिका प्रशासन चिंतेत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग सील केल्यानंतरही रुग्णवाढीचा वेग कमी झाला नाही, तर वेळप्रसंगी नगर शहर काही दिवस बंद ठेवण्याबाबतचा विचारही समोर आला आहे. महापालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.

शहरात गेल्या 3-4 दिवसांत तब्बल 56 करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगाव या भागातील रुग्णसंख्या वाढल्यामुळे हा भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. शनिवारी (दि. 27) तर शहराच्या आडते बाजार व तारकपूर परिसरातही बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
नगर जिल्ह्यामध्ये असणार्‍या कोरोना बाधित रुग्णांचा या आजारातून बरा होण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 50 च्या आतमध्ये आली होती. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात करोना परिस्थिती नियंत्रणात येईल, असे वाटत होते. मात्र बुधवारचा दिवस नगरकरांसाठी चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 24 करोना बाधित आढळले आहेत. यामध्ये तब्बल 18 रुग्ण हे नगर शहरातील आहेत. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 8 तर शुक्रवारी तब्बल 24 रुग्ण शहरात आढळले. नगर शहरामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

तोफखाना, नालेगाव व सिद्धार्थनगर या भागात सर्वात जास्त रुग्ण आढळले असल्यामुळे या भागावर महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे. या भागातून कोणताही नागरिक शहराच्या इतर भागात प्रवेश करणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. पण इतर भागातही रुग्ण आढळू लागल्याने नगर शहराची वाटचाल पुन्हा एकदा ’लॉकडाउन’ दिशेने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post