766 ग्रामपंचायतींवर प्रशासक; राज्यपालांची अध्यादेशावर स्वाक्षरीमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – एप्रिल, मे आणि जूनमध्ये 1 हजार 566 ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या राज्यातील 12 हजार 668 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या अध्यादेशावर राज्यपालांनी काल गुरुवारी स्वाक्षरी केली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील सुमारे 766 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुढील आठवड्यात याबाबत अध्यादेश जारी केला जाणार आहे. मुदत संपलेल्या व करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होऊ न शकणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचार सभा, मेळावे आदींचे आयोजन करण्यात येते. परंतु राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या ग्रमपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार, कोणत्याही कारणामुळे (नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी) मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीबाबत निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार निवडणूक घेता आली नाही तर शासनास त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा अधिकार देण्यात आला आहे. जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची कार्यवाही थांबवावी. तसेच ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल, तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता, त्याठिकाणी प्रशासकाची नेमणूक करावी असे आयोगाने स्पष्ट केले होते. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनासोबत सल्लामसलत करून निवडणूक स्थगिती उठवण्याबाबत व निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयोगाने राज्य सरकारला कळवले होते.

कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती

राहुरी-अंमळनेर, आंबी, बाभूळगाव, चेडगाव, चिंचाळे,चिंचविहिरे, दवणगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, कनगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बुद्रुक, केसापूर, खडांबे बुद्रुक, कोळेवाडी, कोपरे, कुक्कडवेढे, कुरणवाडी, लाख, माहेगाव, पाथरे खुर्द, पिंपळगाव फुणगे, पिंप्री अवघड, राहुरी खुर्द, रामपूर,संक्रापूर,सात्रळ, तांभेरे, तांदूळनेर, तांदुळवाडी, तिळापूर, उंबरे, वडनेर, वळण, वांबोरी, वांजूळपोई, वरशिंदे, वरवंडी, वावरथ, बोधेगाव, धानोरे, गणेगाव, वाघाचा आखाडा आदी 45 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये संपणार आहे.

राहाता-बाभळेश्वर, भगवतीपूर, कोल्हार बुद्रुक, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, ममदापूर, गोगलगाव, हनुमंतगाव, नांदूर, पाथरे बुद्रुक, तिसगाव, आडगाव बुद्रुक, अस्तगाव, एकरूखे, जळगाव, केलवड बुद्रुक, पिंपळवाडी, पिंप्रीलोकाई, रामपूरवाडी, राजंणगाव खुर्द.

श्रीरामपूर-बेलापूर, टाकळीभान, वडाळा महादेव, गळनिंब, घुमनदेव, ब्राम्हणगाव वेताळ, निपाणी वडगाव, कुरणपूर, कारेगाव.

प्रशासक नियुक्तीचा पुढील आठवड्यात शासन निर्णय

राज्यातील एप्रिल, मे आणि जून महिन्यात 1 हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तर जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. परंतु करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुदत संपलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे अशक्य आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार प्रशासक नियुक्तीचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असून पुढील आठवड्यात प्रशासक नियुक्तीचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली.

संगमनेर, पारनेरातील सर्वाधिक ग्रामपंचायती

जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, श्रीरामपूर 27, राहाता 25, राहुरी 45, नेवासा 59, नगर 57, पारनेर 88, पाथर्डी 78, शेवगाव 48, कर्जत 56, जामखेड 49, श्रीगोंदा 59 या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post