अखेर दोन महिन्यानंतर कापडबाजारातील 'हा' भाग झाला सुरू


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारा कापड बाजार आजपासून सुरू झाल्यामुळे नगर मधील ग्राहकांमध्ये चैतन्य पसरले आहे. नगरचा कापड बाजार म्हणजे जिल्ह्यातील अर्थकारणाला गती देणारा उद्योग असं म्हटलं तर ते काही वावगे ठरणार नाही. नगरच्या कापड बाजारला मोठा इतिहास आहे. आज बुधवारी भिंगारवाला चौक ते सक्कर चौक, नवी पेठ मधील श्री राम कॉम्प्लेक्स ते नेतासुभाष चौक, शहाजी रोड ते नवीपेठ मधील दुकाने उघडण्यात आली आहेत. दुकानदारांनी मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर बाउन्सरही तैनात केले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात तुरळक कापड दुकाने नव्या व जुन्या कापड बाजारात आणि गंजबाजारात विखुरलेली होती. नेवासकर, जामगांवकर, बोगावत, कोहिनूर अशी दुकाने त्यात प्रमुख होती. सारडा व इतर काही दुकाने ठोक कापड विक्रीसाठी प्रसिद्ध होती.

दिनांक 27-05-2020
1) कापडबाजार(एम.जी रोड)भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक
2) नवीपेठ-श्रीराम कॉम्लेक्स ते नेता सुभाष चौक
3) शहाजी रोड(घासगल्ली),कापड बाजार ते नवीपेठ
दिनांक 28-05-2020
1) चितळे रोड - तेलीखुट चौक ते चौपाटी कारंजा
2) लक्ष्मीबाई कारंजा- बॅक रोड-जुनाकापडबाजार
3) माणीक चौक-भिंगारवाला चौक
दिनांक 29-05-2020
1) सारडा गल्ली व परिसर
2) मोची गल्ली व परिसर

3) गंजबाजार व परिसर

स्वातंत्र्यानंतर नगरच्या कापड बाजाराचा भक्कम व व्यावसायिक पाया घातला गेला. त्यात स्थानिक कापड व्यापारीवर्गाने केलेली धडपड व शारीरिक परिश्रम मोलाचे आहेत. स्वातंत्र्यानंतर फॅन्सी कापडाची थोडीफार दुकाने नगरला होती. 1992 नंतर नगरला रेडिमेड कपड्यांचे ग्राहक वाढत गेले.
1960 नंतर नगर जिल्ह्यात ऊस उत्पादन व साखर कारखान्यांचे जाळे विणले गेले. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत कापसाची जागा उसाने घेतली. उसामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळू लागला. त्यामुळे लग्नसराई अथवा सणावाराला कापड खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याचा रिवाज निर्माण झाला. त्यात स्वतातला मस्त बाजार व उधारी ठेवण्याची व्यापार्‍यांची तयारी यामुळे नगरचा कापड बाजार केवळ जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाडा, विदर्भ, नाशिक, पुणे, सोलापूर या भागातील ग्राहकांना लोकप्रिय झाला.

कापड उत्पादकांकडून थेट खरेदीमुळे व्यापार्‍यांकडन कमी किमतीत दर्जेदार कपड्यांची विक्री. मालाच्या जास्त उठावामुळे उत्पादकांचाही पैसा मोकळा होत गेला. कमी नफा कमावत ग्राहकांना चांगली सेवा देण्याची पद्धत, उत्पादक व ग्राहक या दोघांसमवेत विश्वासपूर्ण संबंध, व्यापार्‍यांची सचोटी, हातोटी आणि कसोटी यामुळे नगरचा कापड बाजार वाढला.नगर शहरात पूर्वीपासून कापड खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक ग्राहक येतात. येथील कापड दुकानदार चांगली सेवा देतात. इतर शहरांच्या तुलनेत कमी किंमतीत येथे कापड मिळते. मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी किंमत यासाठी येथील कापड बाजार प्रसिद्ध आहे. नगरला खास कापड खरेदी करण्यासाठी आमचे पुणे, औरंगाबाद येथील नातेवाईक येत असतात.
नगरच्या बाजारपेठेत कपड्याच्या व्हरायटी सहज उपलब्ध होतात. कापडाचा बस्ता खरेदीसाठी आल्यानंतर ज्वेलरी, लग्नासाठीच्या इतर साहित्याचीही खरेदी करता येत असल्याने परजिल्ह्यातील नागरिकही याठिकाणी खरेदीसाठी येतात. मेट्रोसिटीपेक्षा येथील कापडाच्या किमतीमध्ये 15 ते 20 टक्के फरक जाणवतो. म्हणुन जिल्ह्यातीलच नव्हे तर पुणे, मुंबईतील नागरीकही कापडबाजारात खरेदीसाठी येत असतात.
शहरातील मुख्य बाजार पेठेतील व्यापारी प्रतिनिधींनी बाजार पेठ सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आ. संग्राम जगताप यांची भेट घेवून चर्चा केली.त्यानंतर आ. जगताप यांच्या समवेत आदेश चंगेडीया, संजय चोपडा, अनिल पोखरणा यांच्या विशेष प्रयत्नतून व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची मंगळवारी (दि.26) दुपारी भेट घेतली.या वेळी झालेल्या चर्चेत विविध पर्याय सुचविण्यात आले. त्यानुसार टप्प्या टप्प्याने बाजार पेठ सुरु करण्यावर एकमत झाले.या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आयुक्त मायकलवार यांनी दुपारी उशिरा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून व्यापार्‍यांच्या मागण्यांनुसार चर्चा केली.त्यानुसार बुधवार 27 मे पासून मुख्य बाजारपेठेतील काही सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बुधवार (दि.27) पासून नगर शहरातील बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस स.10 ते 4 दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्याचे विस्तारित आदेश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काल जाहीर केले. दररोज सायंकाळी 5 ते सकाळी 7 नंतर संचारबंदी कायम राहणार आहे.व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी देण्यात आली आहे.शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेल्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी; पण दुकानातील मालक व कामगार वगळता एकापेक्षा अधिक ग्राहकांना साहित्य प्रत्यक्ष हाताळण्यास मनाई (वारंवार सनेटायझरचा वापर बंधनकारक)करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या मर्यादेत स. 7 ते सायं. 5 ची वेळ, दहा वर्षाखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, आजारग्रस्त व्यक्ती यांना आरोग्याशिवाय अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. केश कर्तनालय/ सलूनसाठी अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाने फोनवर पूर्वकल्पना देऊन वेळ ठरविल्याशिवाय प्रवेश देउ नये. प्रत्येक ग्राहकाने स्वतःचा स्वतंत्र टॉवेल/नॅपकिन सोबत आणणे अनिवार्य. नसेल तर प्रवेशास मनाई आहे. एकाचा टॉवेल दुसर्‍यास वापरण्यास सक्त मनाइ आहे.सलून साहित्य प्रत्येक ग्राहकास वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. सलूनमध्ये सेवा देणारा व घेणारा वगळून इतर प्रत्येक दोन ग्राहकांमध्ये तीन फूट अंतर ठेवण्याची गरज आहे. चार पेक्षा अधिक ग्राहकांना थांबण्यास परवानगी नाही. दाढी, केशकर्तन व सलून झाल्यानंतर खुर्ची प्रत्येक वेळी निर्जंतुक करणे आवश्यक आहे.
दारुची दुकाने, टॅक्सी, कॅब, रिक्शा चारचाकी वाहने (1+2 व्यक्ती), दुचाकी वाहने (1 व्यक्ती), शहरी एकल विक्रेता दुकाने, अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने, ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू, ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तू, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये (100 टक्के उपस्थिती आवश्यक) कृषिविषयक कार्य ,बँक आणि वित्त ,कुरियर व पोस्टल सेवा, वैद्यकिय अतितात्काळ सेवांची हालचाल, प्रेक्षकांना व्यतिरिक्त स्टेडियम ,घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट, ही सर्व दुकाने शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हवाई, रेल्वे व मेट्रो प्रवास, आंतरराज्य मार्ग वाहतूक ,शैक्षणिक संस्था, आदरातिथ्य/ हॉटेल, शॉपिंग मॉल्स , प्रार्थना स्थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे, 65 वर्षे वयावरील व 10 वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा, आंतरजिल्हा बस सेवा, शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून), शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल, सामाजिक/धार्मिक/शैक्षणिक/राजकीय कार्यक्रम/सभा/मेळावे, व्यायामशाळा, जल तरणिका, सर्व धार्मिक स्थळे, हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे, तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे, कँटेटमेंट झोनमध्ये फक्त मालाचा पुरवठा ही एकमेव सेवा सुरू राहील. शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड करण्यात येणार आहे. शारीरिक अंतर ठेवले नाही, थुंकल्यास, मास्क न वापरल्यास एक हजार रुपये दंड ठोकावण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना 5 हजार दंड व दुकान बंद करण्यात येईल. लग्न समारंभाची मर्यादा 20 वरून 50 वर वाढवण्यात आले आहे.वा ग्राहक जास्त वेळ थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही.फक्त पार्सल सेवा देता येईल.हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post