'ही' लक्षणे असणारे रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवा; जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे डॉक्टरांना आदेश


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्‍हयातील सर्व खाजगी व्‍यवसायिक डॉक्‍टर यांना त्‍यांचे दवाखाना वा रुग्‍णालयात आलेल्‍या बाहयरुग्‍ण व आंतरुग्‍णामध्‍ये श्र्वसनाचा त्रास जाणवणारे (SARI) खोकला, ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे रुग्‍ण आढळल्‍यास, त्‍यांना त्‍वरीत जिल्‍हा रुग्‍णालय अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहे. त्यानुसार, हे आदेश जारी करण्यात आले.

यापूर्वीच, अहमदनगर जिल्‍हयातील सर्व खाजगी दवाखाने, सर्व रुग्‍णालये तसेच सर्व मेडीकल दुकाने त्‍यांचे दैनंदिन वेळेनुसार सुरु ठेवणेबाबत व आपत्‍कालीन परिस्थितीत खाजगी व्‍यवसायीक डॉक्‍टर यांनी दवाखाने बंद ठेवल्‍यास त्‍यांची नोंदणी रद्द करण्‍याचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात येईल, असे आदेश जारी करण्यात आले होते.

केंद्र व राज्य शासनाने ज्यांना श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत आहे ( Severe Acute Respiratory Illnes (SARI)) अशा नागरिकांचे सर्व्‍हेक्षण करणेबाबत निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार SARI रुग्‍णाची व्‍याख्‍या खालील प्रमाणे आहे. ज्या ०५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना आचानक सुरु झालेला 38 अंश सेल्‍सीयस ताप असेल, खोकला, घशात खवखव जाणवत असेल, धाप लागणे, श्‍वास घेण्‍यास त्रास होणे आणि रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता भासत असेल तसेच याशिवाय, ज्या 5 वर्षाखालील मुलांना न्यूमोनिया असेल आणि रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता भासत असेल अशा व्यक्तींना सारी रुग्ण म्हणून ओळखले जाते.

कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते साथ रोग अधिनियम 1897 मधे नमुद केलेनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 अन्‍वये दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post