कोरमअभावी स्थायी समितीची सभा तहकूब
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (दि.11) दुपारी आयोजित केलेल्या सभेसाठी सदस्य न आल्याने कोरम अभावी सभा तहकूब करण्याची नामुष्की सभापती मुदस्सर शेख यांच्यावर ओढवली. सदस्यांच्या अघोषित बहिष्कारामागे सभापतींवरील नाराजी असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू होती.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य 31 जानेवारीला चिठ्ठ्यांद्वारे निवृत्त झालेले आहेत. या निवृत्त झालेल्या सदस्यांचा ठराव अद्याप नगरसचिव कार्यालयास गेलेला नाही. त्या ठरावावर सभापतींची स्वाक्षरी झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नवीन सदस्य निवडीसाठी महासभा आयोजित करता आलेली नाही. ही सर्व पार्श्वभूमी असतानाही सभापती शेख यांनी अर्ध्या सदस्यांवरच स्थायी समितीच्या सभा घेण्याचा सपाटा लावलेला आहे. आठ सदस्यांच्या निवृत्तीनंतरची दुसरी सभा बुधवारी दुपारी 1 वाजता बोलाविण्यात आली होती. या सभेत विविध पाच विषय चर्चेसाठी होते. दुपारी 1 वाजता सभापती शेख हे सभागृहात आले. मात्र बराच वेळ अन्य सदस्य न आल्याने कोरम अभावी ही सभा तहकूब करण्याची नामुष्की सभापतींवर ओढावली आहे. सभापतींवरील नाराजीमुळे सदस्यांनी सभेवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे बोलले जात असून याबाबत महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
Post a Comment