माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – अत्याचारातील पीडितेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या गुन्ह्याचा तपास आता तांत्रिक पातळीवर आला आहे. पीडितेला व पतीला विवस्त्र करून आणि अंगावर पेट्रोल टाकून मारहाण केल्याचा व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हाच व्हिडिओ पोलिसांनी तपासाचा केंद्रबिदू केला असल्याचे दिसते आहे.व्हिडिओ नेमका कोठे, कधी, केव्हा, कोणत्या कॅमेर्याद्वारे, कोठून व्हायरल झाला आदी मुद्द्यांचा तपास करण्यासाठी तोफखाना पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यात तिच्या नातेवाईकांचा देखील समावेश आहे. त्यात पीडितेचे दोन दीर, चुलत सासरा आणि भाऊ यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी तोफखाना पोलिसांनी चौकशीसाठी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी नगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करून अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 2) उघडकीस आली. या घटनेनेचे चित्रीकरण समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाले. माध्यमांमध्ये या चित्रीकरण येताच पोलिसांनी त्याची दखल घेत पीडितेची तक्रार नोंदवून घेतली. तोफखाना पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींपैकी पाच जणांना ताब्यात घेतले. या पाच जणांकडे यासंदर्भात दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यात विसंगत माहिती पुढे आली.
माहितीबरोबर पोलिसांनी संबंधित व्हिडिओ देखील चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. हा व्हिडिओचे चित्रीकरण कोठे, केव्हा, कधी झाले? चित्रीकरण मोबाईलमधील कॅमेर्यात की, अन्य कोणत्या कॅमेर्याने झाले. मारणारे व्यक्तींचे चेहरे नेमके कोण होते? समाज माध्यमांवर व्हिडिओ नेमका कोठून व्हायरल झाला? त्यामागचे उद्देश कोणता होता? आदी मुद्यांची तांत्रिक पातळीवर तपास केला जाणार आहे. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आहे. हा व्हिडिओचा तांत्रिक पातळीवरचा तपास आता तेथूनच होणार आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे आणि पीडितेसह तिच्या पतीला झालेल्या मारहाणीच्या दिवसांचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. व्हिडिओ देखील त्याच दिवशीचा आहे का, हे देखील तपासले जाणार आहे. या गुन्ह्याची प्रत्येक पातळीवर चौकशी होणार असल्याची पोलिसांनी भूमिका घेतली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील आणि शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्याचा गेल्या 36 तासांपासून वांरवार आढावा घेत आहेत. दरम्यान, पीडितेने तिच्यावरील अत्याचाराच्या दाखल केलेल्या तक्रारांची माहिती देखील पोलिसांनी घेतली आहे. मागील तक्रारांची आणि आताच्या तक्रारीचा देखील संबंध आहे का, या दृष्टीने देखील तपास पोलीस करणार आहेत.
सीआयडीकडे तपास देण्याची मागणी
अत्याचारित पीडितेसह तिच्या पतीला विवस्त्र करून अंगावर पेट्रोल टाकत मारहाण करण्याचा अमानुषप्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात एकूणच पोलिसांची संशयित बाजू असल्याचा आरोप पीडितेच्या पतीने आज केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांना ऐवजी राज्य गुन्हे अन्वेषण शाखा (सीआयडी) द्यावा, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे. 2016 साली पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर आतापर्यंत दोन वेळेस आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र यामध्ये पोलिसांनी आम्हाला नेहमीच धमकी देण्याचा आणि पुन्हा मागे घ्या, असे सांगण्याचा प्रयत्न केला, आरोपी पेक्षा जास्त दबाव आमच्यावर पोलिसांकडून आल्याचा आरोप करत हा तपास पोलिसांनाऐवजी सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी पीडितांनी केली आहे.
महिला पोलीस अधिक्षकांकडून चौकशी होणार
पीडितेसह पतीला विवस्त्र मारहाण प्रकरणात तिचे नातेवाईक असले, तरी या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र महिला पोलीस अधिक्षकांमार्फत होईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. ही चौकशी एका महिन्याच्या आत केली जाणार आहे. त्याचबरोबर पीडितेने यापूर्वी अशाच प्रकारच्या सात घटनांच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात या तक्रारींमध्ये तथ्य आढळलेले नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख यांच्या या भूमिकेमुळे आता या पीडितेच्या तक्रारीच्या तपासाला वेग येणार आहे.
Post a Comment