मराठीच्या संवर्धनासाठी न्यायधीशांनी निकालपत्र मराठीतून द्यावे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - संतांनी व साहित्यिकांनी मराठी भाषा जपली आहे. मराठी भाषे सारखी गोडवा असलेली कोणतीच भाषा नाही. मात्र इतर भाषांच्या अतिक्रमणाने या भाषेचा गोडवा कमी होत चालला आहे. न्यायालयातील कामकाज संपूर्ण मराठी भाषेतून व्हावे यासाठी उच्च न्यायालयानेही प्रयत्न केले आहेत. आता मराठी भाषेत साक्ष नोंदवली तरी चालेल अशी सुधारणा उच्च व सत्र न्यायालयात केली आहे. आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी न्यायाधीशांनी न्यायालयीन कामकाज जास्तीत जास्त मराठीतून करून निकाल पत्रही मराठीतून द्यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शहर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त जागृती कार्यशाळेचे आयोजन जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून न्या. श्रीराम जगताप बोलत होते. यावेळी जिल्हा न्या. अशोककुमार भिल्लारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सुनीलजीत पाटील, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्ष अॅड.सुहास टोणे, अॅड. योगेश गेरंगे, पॅनल सदस्य अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. शिवाजी कराळे, अॅड. मंगेश सोले आदींसह वक्ते न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक सिताराम काकडे व डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, सर्व न्यायाधीश मंडळी वकील वर्ग विधि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना प्रा.डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न होत आहेत. अभिजात भाषेच्या सगळ्या निकषांमध्ये मराठी भाषा बसत आहे. तरीही अजून दर्जाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मराठीला दुय्यम स्थान दिले जात आहे. इतर भाषांचे आक्रमण थांबवण्यासाठी जास्तीत जास्त कामकाज मराठीतून व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.
प्रा. सिताराम काकडे म्हणाले, आपली मराठी भाषा समृद्ध व संपन्न होती. अलीकडच्या काळात वारंवार इतर भाषांच्या अतिक्रमणे मराठी वर होत आहेत. आपली माता, मातृभूमी व मातृभाषेवर सर्वांनी प्रेम करावे. न्यायालयीन कामकाज मराठी मधून व्हावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
प्रास्ताविकात न्या. सुनिलजित पाटील म्हणाले, राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालयात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होऊन कामकाज मराठीतून चालावे यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम राबवत आहोत. आपण जरी मराठी भाषेतून बोलत असलो तरी मराठी भाषेचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. न्यायालयातील निकाल पत्रक जर मराठी भाषेतून दिले तर सर्वसामान्य नागरिकाला आपल्या खटल्यात नक्की काय निकाल लागला आहे, हे सहजासहजी समजेल. म्हणून सर्वांनी दैनंदिन कामकाज जास्तीत जास्त मराठी भाषेतून करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड. संदीप वांडेकर यांनी केले, आभार विधि स्वयंसेवक स्मिता भरीतकर यांनी मानले. विधिसेवा प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचारींनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post