जयंत पाटील यांच्या 'त्या' टिप्पणीवर हरीभाऊ बागडेंचे जोरदार प्रत्युत्तर!




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. अभिनंदन केलेल्या भाषणात हरिभाऊ बागडे यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या खोचक टिपणीला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी बागडे यांनी आणीबाणीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.


विधानसभेत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूने ऐकायला येत नाही, अशा शब्दांत फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांना टोला लगावला.

जयंत पाटील यांच्या या खोचक टिपणीला बागडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. आणीबाणीचा संदर्भ देत सभागृहातील काहींनी तुम्हाला डावीकडून ऐकायचे, उजवीकडून ऐकायचे, डावीकडे पाहायचे, उजवीकडे पाहायचे असे सांगितले. मात्र माझ्या ऐकण्याची अडचण आजची नाही. ते व्यंग आणीबाणीतले आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी  म्हटले.

तसेच, त्यावेळी माझ्याकडे सत्याग्रह करण्याचे काम होते. त्यामुळे मी दिवस-रात्र हिंडायचो. प्रचंड थंडीतून प्रवास करायचो. त्या थंडीत हातपाय बधीर व्हायचे. त्याचा परिणाम शरीरावर झाला. मी बेशुद्ध पडलो. पण २-३ दिवस डॉक्टरकडे गेलो नाही. तेव्हा मला ऐकू यायचे नाही. या घटनेला आता ४५ वर्ष झाली. काहींना हे माहीत नसेल, म्हणून आज मी हे सांगतो आहे. तुम्ही त्यावेळी कुठे होतात सांगू का? असा सवाल करत ते आज मी सांगणार नाही. कारण मी विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन करायला उभा आहे', असे बागडे यांनी म्हटले.

मला माझ्या व्यंगाचं दु:ख वाटत नाही. तर अभिमानच वाटतो, अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post