सैनिक चंदू चव्हाणची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सर्जिकल स्ट्राइकनंतरअनवधानाने भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या जवान चंदू चव्हाणने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. चंदूने पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांना देखील पत्र पाठवले असल्याचे समजते. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर चंदूची चौकशी करून त्याला अहमदनगर येथे पाठवले. दरम्यान तेथील अधिकारी त्याचा सतत अपमान करत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी चंदूने आरोप केला होता की. पाकिस्तानातून परतल्यानंतर त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात होते.

चार महिन्यानंतर पाकिस्तानातून सुटका

चंदू 2016 च्या सर्जिकल स्ट्राइकनंतर 27 सप्टेंबर रोजी नकळतपणे पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. तेथील तुरुंगात 3 महिने 21 दिवस त्रास सहन केला होता. यानंतर संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या तावडीतून चंदू चव्हाणची सुटका केली होती. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात चंदूने म्हटले आहे की, तो सध्या सुट्टीवर आहे आणि 29 डिसेंबर रोजी त्याला पुन्हा रुजू व्हायचे आहे. तेथे गेल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत भेदभाव केला असा चंदूला संशय आहे. तेथील अधिकाऱ्यांकडून होणारा अवमान आणि त्रासाला कंटाळून चंदूने इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

7 महिन्यांपासून मिळाले नाही वेतन
चंदूने सांगितले की, पाकिस्तानातून परतल्यानंतर त्याला न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागले. यानंतर त्याने सैन्याच्या तुरुंगात 90 दिवसांची शिक्षा भोगली. चंदू म्हणाला की, त्याला अहमदनगरमध्ये पोस्टिंग देण्यात आली आहे. मात्र मागील सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. चंदूने आपला मोबाइल फोन आणि ओळखपत्र जप्त केल्याचा आरोपही केला आहे.
चंदूविरोधात पाच अनुशासनहीनतेचे गुन्हे दाखल

यापूर्वी चंदू आपल्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आमरण उपोषणासाठी बसला होता. दिल्ली पोलिसांनी तेथून त्याला ताब्यात घेतले आणि सैन्य पोलिसांच्या स्वाधीन केले. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदू चव्हाण विरोधात अनुशासनहीनतेचे पाच खटले सुरू आहेत. याशिवाय मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंदू चव्हाणविरुद्ध धुळ्यातील प्रशासनाकडूनही तक्रारी आल्या होत्या.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post