बंदी नसलेले प्लास्टिक बाळगणार्यांवरही सरसकट कारवाई
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात महापालिका प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 2-3 दिवसापासून कारवाईची धडक मोहिम राबविली जात आहे. मात्र, या मोहिमेत बंदी नसलेले प्लास्टिक बाळगणार्यांवरही सरसकट कारवाई केली जात आहे. कायद्याचा धाक दाखवून सुरू असलेल्या दंड वसुलीमुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक व थर्माकोल वापरावर बंदी घातलेली आहे. मात्र, या बंदीतून काही प्रकारच्या प्लास्टिकला वगळण्यात आलेले आहे. प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर नगर शहरात याबाबत मोहिम राबविण्यात आली होती मात्र गेले अनेक दिवस ही मोहिम बंद होती. महापालिकेच्या आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी घेतल्यानंतर स्वच्छता अभियानात महापालिकेची कामगिरी सुधारण्याचे नियोजन त्यांनी हाती घेतले. घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी याबाबत आढावा बैठक घेतली असता प्लास्टिक विरोधी कारवाई बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षकांना दंड वसुलीचे टार्गेट दिले. हे टार्गेट पुर्ण करण्यासाठी गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या अधिकार्यांनी सरसकट कारवाई केली आहे. यामध्ये ज्या वस्तू बंदीतून वगळण्यात आल्या आहेत त्या बाळगणार्या व्यापार्यांवरही कारवाई करण्यात आल्याने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कायद्याची अंमलबजावणी की मनाचा कायदा
प्लास्टिक बंदीचा कायदा करताना शासनाने त्यातून काही प्रकारचे प्लास्टिक वगळले आहे व त्याच्या वापरास परवानगी दिलेली आहे. ही बाब अनेक व्यापार्यांनी कारवाई करणार्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकार्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता दंडात्मक कारवाई केली त्यामुळे अनेक ठिकाणी महापालिकेचे पथक व व्यापार्यांमध्ये वादविवाद झाले. अनेक व्यापार्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच पर्यावरण मंत्रालय यांच्या संकेतस्थळावर कोणत्या प्लास्टिकला बंदी व कोणत्या प्लास्टिकला नाही याचा सविस्तर तपशिल प्रसिद्ध केलेला आहे. तो दाखविण्याचा प्रयत्न केला. तरीही या पथकाकडून कायद्याचा धाक दाखवत चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचे अनेक व्यापार्यांनी ‘दैनिक नवा मराठा’ कार्यालयात संपर्क साधून निदर्शनास आणून दिले. प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आहे की, मनाचा कायदा राबवण्यासाठी असा सवालही अनेक व्यापार्यांनी उपस्थित केला.
कायद्याचा विनाकारण बडगा नको
प्लास्टिक बंदीचा कायदा केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, या कायद्याचा विनाकारण बडगा उगारुन नागरिकांना, व्यापारी वर्गास वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदी आदेशाचे व्यवस्थित वाचन करुन कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
अन्यायकारक कारवाई विरोधात लढा उभारणार
सध्या मंदिचे वातावरण आहे त्यामुळे व्यापार थंडावलेला आहे. बाजारपेठेतील व्यापारी वर्ग ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत. या काळातच महापालिका प्रशासनाकडून कायद्याचा धाक दाखवत विनाकारण भितीचे वातावरण निर्माण करुन कारवाई केली जात आहे. या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याच्या विचारात व्यापारी वर्ग असून लवकरच शहरातील व्यापार्यांची या संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment