जिल्हा नियोजन मंडळाच्या रिक्त जागांसाठी 24 डिसेंबरला मतदान
माय अहमदनगर वेेेब टीम
अहमदनगर - जिल्हा नियोजन मंडळाच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारपासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
जिल्हा नियोजनच्या जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र) यामधून राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटातील सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून महापालिका (मोठ्या नागरी निर्वाचन) क्षेत्रातून तीन जागा मुदत संपल्याने रिक्त झाल्या आहेत. नगरपालिका-नगरपरिषद (लहान नागरी निर्वाचन) क्षेत्रातून एक जागा रिक्त झाली आहे. या पाच जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सोमवार (दि.2) ते गुरूवार (दि.5) या काळात उमेवादी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याच दिवशी दाखल उमेदवारांची नावे प्रसिध्द करण्यात येणार आहे.
त्यानंतर शुक्रवारी 6 तारखेला छानणी होणार असून शनिवार (दि.7) वैध उमदेवारी अर्जाची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. याच काळात उमदेवारी अर्जासंदर्भात अपिल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 13 तारखेला वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असून 16 तारखेला माघार घेता येणार असून 24 तारखेला प्रत्यक्षात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या काळात मतदान प्रक्रिया होणार असून 26 तारखेला मतमोजणी होणार आहे.
मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही महासैनिक लॉन या ठिकाणी होणार आहे. या निवडणुकीत ग्रामीण निर्वाचन क्षेत्रासाठी उर्मिला पाटील महसूल उपजिल्हाधिकारी, मनपा निर्वाचन क्षेत्रासाठी अजय मोरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन आणि लहान निर्वाचन क्षेत्रसाठी शाहुराज मोरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
Post a Comment