नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) मध्ये गुंतवणूक ही भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उत्तम गुंतवणूक मानली जाते. सेवानिवृत्तीनंतर गुंतवणुकदारांना एकरक्कमी पैसा मिळतो आणि त्यापैकी काही रक्कम पेन्शनरुपातून मिळते. याशिवाय एनपीएसमधील गुंतवणूक ही करमुक्त असल्याने सध्याच्या काळातही फायदेशीर मानली जात आहे. एनपीएसवर सध्या व्याजदर हा आठ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अन्य ठेवी योजनांतील व्याजदर कमी होत असताना एनपीएमधून मिळणारा परतावा आकर्षक आहे.
याशिवाय करमुक्तीचा लाभही मिळतो. म्हणून एनपीएसमधील आकर्षक नियमांमुळे उच्च वेतनदारांना हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यासंदर्भात बीएनपी फिनकॅपचे सीइओ ए.के.निगम म्हणतात, प्रत्येक नोकरदार वर्गाला एका काळानंतर सेवानिवृत्तीची योजना आखावी लागते. एनपीएस ही सध्याच्या काळातील आदर्श गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या या एनपीएसच्या कपातीसाठी केवळ मूळ वेतनाला आधार म्हणून गृहित धरतात. तरीही ही योजना बर्याच अंशी आकर्षक आहे. यात नोकरदार वर्ग स्वत: प्राप्तीकरातून सवलत मिळवू शकतो तर कंपनीकडून जमा करण्यात येणारी रक्कम देखील करमुक्त असते. याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे निवृत्तीनंतर गुंतवणूकदाराला मिळणारा आर्थिक आधार. गरज भासल्यास आपण अधून-मधून काही रक्कम काढू शकतो. एनपीएस योजनांतील वैशिष्ट्ये पाहू या.
असा मिळेल दुहेरी लाभ: प्राप्तीकर नियम 80 सीसीडी (1) प्रमाणे एनपीएसचे टीयर-1 खात्यात दीड लाख रुपये वार्षिक जमा करु शकतो. अर्थात याप्रमाणे दीड लाखांची मर्यादा असणारे जीवन विमा हप्ता, ईपीएफ, पब्लिक प्रॉव्हिडंड फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यासारखे गुंतवणुकीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. मात्र एनपीएसमधील गुंतवणुकीवर अतिरिक्त 50 हजार रुपयाची करसवलत देण्याचाही विचार केला गेला आहे. जर आपण केवळ एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल तर वार्षिक दोन लाख रुपयांवर प्राप्तीकर सवलतीसाठी दावा करु शकतो. याशिवाय कंपनी देखील आपल्या वेतनाच्या दहा टक्क्यांच्या बरोबरीने रक्कम एनपीएसमध्ये टाकू शकते. जर आपले वार्षिक वेतन 50 लाख रुपये असेल तर एनपीएसमध्ये पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. अशा स्थितीत एकूण 7 लाख रुपयांची एनपीएसमधील गुंतवणूक करमुक्त होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी या रक्कमेला कंपनीचा खर्च म्हणून दाखवून स्वत:ही करमुक्तीचा लाभ घेऊ शकते.
60 टक्के रक्कम काढणे करमुक्त: सरकारने एनपीएसच्या परिपक्वतेचा कालावधी झाल्यानंतर पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्याबरोबरच कर सवलतही दिली आहे. जर आपण 60 वर्षानंतर एनपीएसमधून पैसे काढत असाल तर एकूण रक्कमेच्या 60 टक्के रक्कम काढू शकतो. त्यावर कोणताही कर आकारला जात नाही. उर्वरित 40 टक्के रक्कमेतून अॅन्यूटी खरेदी करणे बंधनकारक आहे. ही रक्कम आपल्या मासिक तत्त्वावर पेन्शनच्या रुपाने दिली जाते. यानंतरही आपण एक रक्कमी पैसे घेऊ शकतो. त्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
नोकरदार-व्यापार्यांसाठी वेगळे नियम: एनपीएसमध्ये टीयर-1 आणि टीयर 2 खाते सुरू केले जाते. त्यात पहिले बंधनकारक आणि दुसरे पर्यायी आहे. प्राप्तीकर नियमाच्या कलम 80 सीसीडीनुसार टियर 1 मध्ये नोकरदारांना एकूण वेतनाच्या दहा टक्क्यांवर कर सवलत मिळते. केंद्रीय कर्मचार्यांना यासाठीची मर्यादा चौदा टक्के आहे. यात मूळ वेतन आणि डीएचा समावेश आहे. जर आपण व्यापारी असाल तर एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के बरोबरीने कर कपातीचा दावा करु शकता. या उत्पन्नात सर्व प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश आहे. त्याची गणना प्राप्तीकराच्या तरतुदीनुसार केली जाते.
सावधगिरी बाळगा
एनपीएस खात्यात वार्षिक 6 हजार रुपये जमा करणे गरजेचे आहे.
एखाद्या वर्षात पैसे जमा न केल्यास गुंतवणुकदाराला दंड भरावा लागतो.
60 वर्षाच्या अगोदर जमा रक्कमेपैकी केवळ 20 टक्के रक्कमच काढू शकतो.
आपले एनपीएस खाते वयाची 70 होईपर्यंत बंद करणे गरजेचे आहे.
Post a Comment