मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताय ?



माय अहमदनगर वेब टीम
गुंतवणूक हा जिव्हाळ्याचा आणि व्यावहारिकतेचा विषय. गुंतवणुकीचे सल्ले दिले जातात, परंतु प्रत्येकजण आपापल्या परीने गुंतवणूक अणि बचत करत असतो. अर्थात बचत आणि गुंतवणूक यात फरक जाणून घेतला पाहिजे. वाचवलेला पैसा हा बचत आणि हा बचतीचा पैसा एखाद्या योजनेत टाकणे म्हणजे गुंतवणूक. केवळ बचत करुन भागणार नाही तर तो पैसा कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजघडीला बाजारात असंख्य गुंतवणूक योजना आहेत. आज गुंतवणूक केली की उद्या मोठी रक्कम आपल्या हातात पडेल, अशा भ्रमात राहू नका. गुंतवणूक वाढण्यासाठी थोडासा वेळ द्या. त्यानंतरच चांगला पैसा उभा करु शकतो आणि भविष्य सुरक्षित राखू शकतो. गुंतवणूकीला लवकर सुरुवात केली तर पैसा देखील मोठ्या प्रमाणात उभा राहिल.

आपल्या पाल्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी त्याच्या वाढदिवसाला नियमित गुंतवणुकीची भेट देणे हा एक चांगला उपक्रम ठरु शकतो. ही गुंतवणूक दिर्घकाळासाठी मोठी रक्कम उभा करण्यासाठी फायदेशीर ठरेल आणि या माध्यमातून तो त्याच्या गरजा सहजपणे पूर्ण करु शकतो. गुंतवणुकीसाठी आपण अधिक पैसा गोळा करण्यात वाट पाहू नका. गुंतवणुकीची सुरवात ही मुलाच्या जन्मापासूनच करायला हवी. कारण जेवढी लवकर गुंतवणूक सुरू कराल, त्याप्रमाणात आपल्याला कपांउडिंगचा लाभ मिळेल.

कंपाउंडिंगचा अर्थ आपल्या मूळ रक्कमेवर जो परतावा मिळतो, त्यावरही भविष्यात मिळणारा परतावा. या आधारावर आपली गुंतवणूक वाढत जाते आणि दिर्घकाळानंतर मोठा निधी जमा होतो. यासंदर्भात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिले म्हणजे गुंतवणूक परिपक्व होण्याची आणि ती रक्कम भरभक्कम होण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहा. दुसरी म्हणजे गुंतवणूक सुरूच ठेवा. आपण किती गुंतवणूक करता, याला महत्त्व नसून आपण किती काळ करता, या गोष्टीला महत्त्व आहे. यासाठी गुंतवणूक सल्लागार हे चांगल्या परताव्याबरोबरच कंपाऊंडिंगचा लाभ मिळण्याकरीता गुंतवणूकदारांना मदत करत असतात.

लवकर सुरू करा गुंतवणूक: लवकरात लवकर गुंतवणूक सुरू केल्यास आपल्याकडे मोठ्या प्रमाणात निधी उभा राहिल. जर आपण मुलाच्या जन्मापासूनच किमान 2 हजार रुपयाची गुंतवणूक सुरू करत असाल आणि त्यावर 12 टक्के परतावा मिळत असेल आणि त्या परताव्याला देखील मूळ रक्कमेबरोबरच गुंतवणूक करत असाल तर वयाच्या 18 व्या वर्षी 15 लाख रुपये मिळतील. यादरम्यान आपली मूळ रक्कम ही केवळ 4 लाख 32 हजार रुपये असेल.

मोठ्या लाभापासून वंचित राहाल: गुंतवणुकीसाठी आपण पाच वर्षे विलंब केल्यास काय होईल? असा प्रश्‍न साहजिकच मनात उत्पन्न होऊ शकतो. जर आपण तेवढीच रक्कम गुंतवणूक कराल तर तेवढाच परतावा मिळेल. जेव्हा आपल्या मुलाचे वय 18 होईल, तेव्हा आपला पैसा वाढून तो 75 लाख रुपयांपर्यंत पोचेल. शेवटी गुंतवणुकीला विलंब झाल्याने निधी कमी राहिला. अशावेळी निधी मोठा होण्यासाठी आपल्याला पैसा अधिक गुंतवावा लागेल.

गुंतवणूक वाढवत राहा: गुंतवणूकीची मूळ रक्कम वाढल्याने आपल्याला आश्‍चर्यकारक परतावा मिळू शकतो. उदा. मुलाच्या जन्मानंतर त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला आपण मूळ रक्कमेच्या गुंतवणूकीत पाचशे रुपये वाढ केल्यास त्याचा परिणाम काय होईल? 18 व्या वर्षात आपला पैसा 36 लाखांवर पोचेल.

आर्थिक शिस्त बाळगा: गुंतवणुकीचे कपाऊंडिंग सायकल तुटणार नाही, याची खबरदारी घ्या. उदा. आपण दहाव्या वर्षी आपल्या निधीतून दोन लाख रुपये काढले आणि तेवढीच रक्कम पुन्हा त्यात जमा केली नाही तर अशा स्थितीत 18 व्या वर्षी आपला पैसा हा केवळ दहा लाख रुपयेच होईल. आपण केवळ दोन लाख रुपये काढले होते, मात्र आपले नुकसान दोन लाखांपेक्षा अधिक आहे. जर आपल्याला आर्थिक अडचणींमुळे पैसे काढायची गरज भासल्यास तेवढीच रक्कम पुन्हा गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा: जर आपल्याला एखाद्या गुंतवणुकीतून 12 नाही 8 टक्के परतावा मिळत असेल तर अशा स्थितीत 18 वर्षात आपला पैसा 9.7 लाखांपर्यंतच पोचेल. म्हणजेच 12 टक्के दराने मिळणार्‍या परताव्याच्या तुलनेत ही रक्कम 5.3 लाख रुपये कमीच असणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post