किती आहे तुमची कर्जपात्रता ?
माय अहमदनगर वेेेब टीम
सणासुदीच्या काळात आपल्याला वैयक्तिक कर्जासाठी फोन येत असतील. काहीवेळा आपल्याला या फोनचे आश्चर्यही वाटू शकते. कारण हा फोन त्यांनी कोणत्या आधारावर केला, असा प्रश्न पडू शकतो. मात्र कधीकाळी आपण घेतलेले कर्ज हे वेळेत फेडल्याने त्याची हिस्ट्री संबंधित वित्तिय संस्थेकडे असते. या आधारावर आपल्याला फोनन येतो आणि आकर्षक योजनांच्या आधारे कर्जाची ऑफर केली जाते. ही ऑफर देण्यास क्रेडिट स्कोरही तितकाच कारणीभूत घटक असतो. क्रेडिट स्कोर हा आपल्या जुन्या कर्जाचे संख्यात्मक प्रतिनिधित्व आहे. ही संख्या 800 ते 900 च्या रेंजमध्ये असते. जेवढा चांगला स्कोर असेल, त्याप्रमाणात अधिक कर्ज मिळण्याची शक्यता अधिक राहते. बँक आणि वित्तिय संस्था या चांगल्या क्रेडिट स्कोर असणार्या मंडळींना कर्ज देतात. या आधारावर कर्जदार हा वेळेत कर्ज फेडेल असे गृहित धरले जाते.
भारतात क्रेडिट स्कोर हा चार ब्युरोंकडून दिला जातो. ट्रान्सयूनियन सीबिल, इक्वीफॅॅक्स, एक्स्पेरियन आणि क्रिफ हायमार्क यांचा समावेश आहे. क्रेडिट स्कोर हा एक गतीशील आकडा आहे. हा आकडा आपल्या कर्जस्थितीवरुन सतत बदलत राहतो. चांगला क्रेडिट स्कोरसाठी आर्थिक पतवर परिणाम करणार्या सर्व घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. अर्थात आपण कळत नकळतपणे क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम करणार्या गोष्टींचाही अंमल करत असतो.
मोठे कर्ज : गृहकर्ज हे सहजपणे काही लाखांपर्यंत मिळते आणि त्याचा कालावधी देखील दहा ते तीस वर्षाचा असतो. त्यापेक्षा मोठी बाब म्हणजे घराकडे कायमस्वरुपीची गुंतवणूक म्हणूनही पाहत असतो. त्यामुळे चांगले घर मिळण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतो आणि पर्यायाने मोठे कर्ज घेण्यासाठी विचार होतो. घराची देखभाल, इंटरेरियर आदींमुळे खर्च वाढत जातो. साहजिकच कर्जाचे प्रमाण वाढत जाते. जर आपण गृहकर्जाव्यतिरिक्त अन्य मार्गाने कर्ज घेतले तरी कर्जाची संख्या वाढत जाते. मोटार कर्ज, वैयक्तिक कर्ज, गोल्ड लोन यासारख्या कर्जाच्या आहारी जावून आपण कर्जाच्या जाळ्यात अडकतो. हप्त्याचे प्रमाण वाढत जाते आणि उत्पन्नाचा बराच मोठा भाग कर्ज भरण्यातच जातो. कालांतराने संबंधित व्यक्ती कर्ज घेण्यास अपात्र देखील ठरू शकते.
हप्ता भरण्यास कुचराई: आजकाल स्पर्धेच्या युगात कर्ज मंजूर करुन घेणे फारसे अडचणीचे ठरत नाही. क्रेडिट स्कोर चांगला असेल तर आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता होत असेल तर खासगी किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळते. मात्र आपल्याला मासिक खर्च भागवताना हप्त्याची जमवाजमव करण्यास अडचण येत असेल तर आपला क्रेडिट स्कोर कमी होईल. काही हप्ते हे अन्य हप्त्याच्या तुलनेत अधिक असतात. जसे की वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता हा गृहकर्जाच्या हप्त्यापेक्षा अधिक राहतो.
कर्जाची सळमिसळ: कर्जाची उत्तम सळमिसळ ही सुरक्षित आणि असुरक्षित कर्जाचे मिश्रण असते. हे आपल्या क्रेडिट स्कोरमध्ये सामील होत असते. जादा प्रमाणात असुरक्षित क्रेडिट उत्पादन जसे की पर्सनल लोन्स, क्रेडिट कार्डवरील कर्ज हे आपल्याला सक्षम कर्जदार म्हणून ओळख निर्माण करु शकत नाहीत. जर असुरक्षित कर्जाची संख्या अधिक असेल तर गृहकर्ज हे आपल्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये सुरक्षित कर्ज म्हणून सामील करता येते. कारण खरेदी केले जाणारे घर हे सुरक्षित असते. गृहकर्ज हे आपल्याला चांगला क्रेडिट स्कोर राखण्यासाठी आणि कर्जाची योग्यरितीने सळमिसळ करण्यासाठी उपयुक्त ठरते.
काटेकोरपणे तपासणी: एखाद्या कर्जासाठी आपल्याकडून जेव्हा अर्ज मागितले जातात, तेव्हा ते कर्ज खरोखरच आपल्या सिबिल स्कोरच्या आधारावर आहे की नाही, याची खातरजमा करुन घेणे गरजेचे आहे. जर आपण कोणतीही हालचाल केलेली नसेल आणि गृहकर्जासाठी अर्ज केला असेल तर आपल्या क्रेडिट रिपोर्टची काटेकोरपणे होणारी तपासणी जोखमीची ठरू शकते. आपण क्रेडिट स्कोर राखण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याची तीन ते सहा महिन्याच्या कालावधीनंतर तपासणी करायला हवी. कर्जासाठी अर्ज करण्यापूवी त्याचा आढावा घ्यायला हवा. यानुसार आपल्याला चुका सुधारण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. एक चांगला क्रेडिट स्कोर हा आपल्या आर्थिक तब्येतीसाठी महत्त्वाचा आहे. क्रेडिट स्कोरची नियमितपणे तपासणी करा, सध्याचे कर्ज प्रामाणिकपणे आणि वेळेत भरण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरुन आगामी काळात नव्याने कर्ज घेण्यास आपण पात्र राहू शकू.
Post a Comment