भीती कर्करोगाची? मग बातमी आपल्यासाठी!



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - कॅन्सर ऊर्फ कर्करोग हा शब्द उच्चारला की, व्यावहारिक पातळीवर कधीही बरा न होणारा दुर्धर आजार, त्यावरची महागडी औषधे व चाचण्या आणि तरीही त्यांच्या परिणामकारकतेबद्दलची अनिश्चितता... अशी बरीच लांब साखळी कोणाच्याही मनामध्ये उमटते! अगदी सुरुवातीला लक्षात आलेला कर्करोग बरा होतोही; परंतु त्यासाठी सध्या वापरल्या जात असलेल्या चाचण्या, यंत्रणा आणि प्रणाली जरा अपुर्‍या ठरत आहेत हे सत्य आहे. आता मात्र रुजर्स विद्यापीठातील संशोधकांच्या एका संघाने (यामध्ये भारतीय आणि मराठीही व्यक्ती आहेत) कर्करोगास कारणीभूत ठरणारे ‘ट्यूमर’ वेळेवरच शोधून काढण्याची एक नवी पद्धत विकसित केली आहे. तिच्याविषयी थोडेसे...

कॅन्सर म्हणजे काय किंवा तो कसा होतो, याबद्दल वाचकांना माहिती असेलच. अगदी थोडक्यात पुन्हा सांगायचे, तर आपल्या शरीरातील विविध ऊती आणि पेशींचे काम एरव्ही बिनबोभाट सुरू असते; परंतु काही वेळा त्यांच्यातील काही पेशी त्यांना मिळालेली आनुवंशिक आज्ञावली पाळेनाशा होतात. अशांचा अकाली मृत्यू होतो किंवा त्या सोपवलेले काम नीटपणे करेनाशा होतात. अशा पेशींचा साधारणतः गठ्ठा बनतो, त्याला ‘कॅन्सर ट्यूमर’ म्हणतात. तंबाखू, दारू व इतरही प्रकारची अयोग्य जीवनशैली, पर्यावरणीय घटक, काही प्रमाणात आनुवंशिकता अशा काही ठळक बाबींचा प्रभाव आपल्या शरीरातील जीन्स, डीएनए अशा घटकांवर पडतो. परिणामी, संबंधित व्यक्तीला कर्करोग होतो. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि त्यावर उपायही तितकेच जालीम करावे लागतात - कारण, वर म्हटल्याप्रमाणे, अगदी आरंभीच्या काळात कर्करोगग्रस्त पेशी (बाल्यावस्थेतील गाठ) शोधणे आतापर्यंत शक्य होत नव्हते. म्हणजेच कॅन्सरचे पक्के निदान होईपर्यंत तो शरीरात बर्‍यापैकी पसरलेला असतो!

नवतंत्रज्ञानाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये, यापूर्वी म्हणजे विसाव्या शतकात फारशा हाती न आलेल्या, नॅनोटेक्नॉलॉजी ऊर्फ सूक्ष्म तंत्रज्ञान या शाखेची विलक्षण प्रगती झाली आहे आणि तिचे विविध फायदे अंतराळ संशोधनापासून धान्योत्पादनापर्यंत दिसत आहेत. वैद्यकीयशास्त्रेही याला अपवाद नाहीत. कर्करोगाचा छडा लावणारे हे नवे संशोधन सूक्ष्म तंत्रज्ञानामुळेच प्रत्यक्षात येऊ शकले आहे. या पद्धतीमध्ये कर्करोग संशयित रुग्णाच्या शरीरात सूक्ष्मकण म्हणजेच नॅनोपार्टिकल सोडले जातात. हे कण लघुतरंग लांबीचा (शॉर्ट वेव्ह) इन्फ्रारेड प्रकाशकिरण सोडतात. रक्तप्रवाहात मिसळलेले हे सूक्ष्मकण, विशिष्ट गुणधर्माच्या, कर्करोगग्रस्त पेशी ओळखतात आणि त्यांना चिकटून आपला प्रवास चालू ठेवतात. त्यांच्यातून निघणार्‍या इन्फ्रारेड प्रकाश संदेशांद्वारे त्यांचा मागोवा (ट्रॅक) ठेवता येतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगांतून यांची कार्यक्षमता सिद्ध झालेली आहे. (जाता जाता - उंदीर आणि माणसाची जनुकीय रचना पुष्कळच सारखी असल्यामुळे प्रथमतः नेहमी उंदरांवर प्रयोग केले जातात व त्यांच्या यशस्वितेवरून काढलेले निष्कर्ष मानवाला मोठ्या प्रमाणात लागू पडतात.) तर या कर्करोगग्रस्त उंदरांमधील बाधित पेशी या सूक्ष्मकणांनी बरोबर शोधल्या तसेच त्यांचे शरीरभर पसरणेही चिन्हित केले.

अगदी सुरुवातीच्या, प्राथमिक स्थितीतील कर्करोगाचाही छडा लावण्याचा काही तरी मार्ग शोधण्याची आमची बरेच दिवस महत्त्वाकांक्षा होती. आता आमचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे, असे संबंधित शास्त्रज्ञ प्रभास मोघे यांचे म्हणणे आहे. शरीराच्या कोणत्याही भागात दडून बसलेल्या कर्करोगग्रस्त पेशींना हे सूक्ष्मकण, तिथपर्यंत पोहोचून, शोधून काढू शकतात, असे या प्रकल्पातील आणखी एक शास्त्रज्ञ विद्या गणपती यांनी सांगितले आहे. ग्रस्त पेशींचा मागोवा घेण्याचे आणि त्यांच्या प्रतिमा डॉक्टरांना पुरवण्याचे हे काम थेट म्हणजे रिअल टाईममध्ये केले जात असल्याने त्यांचा जागेवरच समाचार घेणे शक्य होते.

या संशोधनाला अधिक व्यावहारिक स्वरूप दिले जात असून, येत्या फक्त 5 वर्षांत ते सर्वत्र वापरता येईल, असे दिसते. त्यामुळे कर्करोगाशी संबंधित जगभरातील वैद्यकविश्वामध्ये अभूतपूर्व बदल होऊन या चिवट, वेदनादायक आणि कायमस्वरूपी आजाराशी अधिक कार्यक्षमतेने सामना करणे शक्य होईल, असा दिलासादायक निष्कर्ष काढायला हरकत नाही. कारण, सध्या वापरल्या जाणार्‍या तंत्रप्रणालींच्या तुलनेमध्ये, हे सूक्ष्मकण कर्करोगग्रस्त पेशींचा छडा काही महिने आधीच लावू शकतात. शिवाय, पारंपरिक साधनांना हे ट्यूमर ओळखू येण्यासाठीही ते काही विशिष्ट आकाराचे असावे लागतात - आणि ते तेवढे मोठे झाले की, त्यांच्यावर इलाज करणे अवघड बनते! हे दुष्टचक्र सूक्ष्मकणांद्वारे भेदले जाऊ शकते; कारण ते अगदी छोट्या गाठीही ओळखू शकतात. कर्करोगग्रस्त पेशींचा शरीरभर हळूहळू; परंतु निश्चितपणे होणारा प्रसार ओळखू येत नसल्याने या आजारावर केल्या जाणार्‍या शस्त्रक्रियात्मक उपचारांना मर्यादा पडतात व
व त्यांचा पूर्णपणे उपयोग होत नाही, असे स्टीव्हन लिबुटी (रुजर्स कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक) यांचे म्हणणे आहे. यामुळे औषधोपचार आणि त्यांची एकंदर दिशा ठरवणेही अवघड बनते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post