माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला १४५ हा 'जादुई आकडा' उच्चारण्याचे भाग्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या वाट्यास शनिवारी आले. सरकारला पाठिंबा देण्यासाठी हात वरती केलेले लंके यांचे सभागृहातील त्या क्षणाचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे.
राज्याच्या विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हा ठराव दुपारी मताला टाकला होता. तत्पूर्वी विरोधी बाकावर असलेल्या भाजप सदस्यांनी सभात्याग केला. मग, उपस्थित सदस्यांच्या शिरगणतीस प्रारंभ झाला. 'वेल'च्या पहिल्या रांगेपासून गणती सुरू झाली. आपले नाव त्यानंतर क्रमांक असे आमदार उच्चारत होते.विधानसभेत २८८ सदस्य आहेत. म्हणजे १४५ सदस्यांचा पाठिंबा असला की विश्वासदर्शक ठराव मंजूर होतो. एक, दोन, तीन करत ही शिरगणती पाचव्या रांगेत पोहोचली. शेवटच्या बाकावर बसलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी आपले नाव सांगून १४५ आकडा उच्चरला. हा जादुई आकडा उच्चारताच सभागृहात एकच जल्लोष झाला. बाके वाजवून सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मागच्या आसनावर बसलेले पुत्र आदित्य यांनी पित्यास हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या.आपण कसे भाग्यवान ठरलो हे काही क्षण लंके यांनाच समजले नाही. सभागृहातील सर्व सदस्याच्या नजरा काही काळ लंके यांच्यावर खिळल्या होत्या. गॅलरीतील प्रत्येकाला तो भाग्यवान आमदार कोण, अशी उत्सुकता होती. लंके यांचे ते छायाचित्र काही क्षणात समाजमाध्यमांवर गेले. पारनेर या लंकेंच्या मतदारसंघात ते लगोलग व्हायरल झाले. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लंके यांच्याबरोबरचे छायाचित्र ट्विट करत राष्ट्रवादीच्या आमदाराने जादुई आकडा उच्चारून इतिहास घडवला असे ट्विट केले.
Post a Comment