गाझीनगरचा पाणीप्रश्‍न आमदारांच्या दरबारी


माय नगर वेब टीम 
अहमदनगर - अनेक महिन्यांपासून नळाला पूर्ण दाबाने पाणी येत नसल्याने व मनपा प्रशासनाला वारंवार मागणी करुन देखील पाणी प्रश्‍न सुटत नसल्याने काटवन खंडोबा रोड येथील गाझी नगर भागातील महिलांसह नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. तर पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याचे आग्रह धरले.
काटवन खंडोबा रोड येथील गाझी नगर भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून नळ कनेक्शन असून देखील त्याला पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना भटकंती करावी लागत असून, शहरात राहून देखील ग्रामीण भागात राहत असल्याची परिस्थिती मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. पाण्याची पाईपलाईन टाकल्या पासून आजपर्यंत नळाला पूर्ण दाबाने कधीही पाणी आलेले नाही. संपूर्ण उन्हाळ्यात या भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र हा प्रश्‍न अधिकच गंभीर बनत चालला आहे. सर्व नागरिक महापालिकेला पाणीपट्टी भरून देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शेवटच्या टप्प्यात आतील भागात राहत असलेल्या नळांना अद्यापि कधी पाणी आलेले नाही. या भागात अधिकृत व अनाधिकृत नळ कनेक्शन किती? हा देखील मोठा प्रश्‍न निर्माण झालेला असून त्याची चौकशी करण्याची गरज आहे. आगरकर मळा येथील पाण्याच्या टाकीतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन व वेळ नसल्याने नागरिकांना कधीही पाणी सुटण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या भागातील सर्व नागरिकांना किमान नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळण्याकरिता तातडीने मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे. यावेळी हाजराबी शेख, हसीना शेख, समिना शेख, कमल दातरंगे, फरिदा शेख, आशा गायकवाड, कमल इंगळे, सकिना शेख, रेहाना बागवान, मनिषा शिंदे, आशा शिंदे, शाहिन शेख, नजीर पठाण, भास्कर गायकवाड, खलील शेख, प्रकाश शिंदे आदी नागरिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post