गावरानला ८२ तर लाल कांद्याला ६२ रुपये भाव



नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव सुरु
माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नेप्ती उपबाजारात होणारे कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी (दि. ३०) याची अंमलबजावणी करत पहिले रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव पार पडले. पहिल्याच लिलावाला सुमारे २० हजार गोण्यांची आवक झाली होती, तर या लिलावात गावरान कांद्याला ८२ रुपये किलो व लाल कांद्याला ६२ रुपये प्रतिकिलोचा उच्चांकी दर मिळाला.

यावेळी सभापती विलासराव शिंदे व उपसभापती रेवणनाथ चोभे, संचालक शिवाजी कारले, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, कानिफनाथ कासार, रावसाहेब साठे, सचिव अभय भिसे, निरीक्षक संजय काळे, जयसिंग भोर, हिराबाबा पुरी आदी उपस्थित होते.

कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने करण्याबाबत अनेक दिवसापासून नगर बाजार समितीचे संचालक मंडळ विचार करत होते. यासाठी संचालक मंडळाने नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार, राहुरी बाजार समितीला भेट देवून तेथील लिलाव पद्धतीची समक्ष पहाणी केली. त्यानंतर नगर बाजार समितीच्या नेप्ती येथील कांदा लिलावही रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बाजार समितीने हमाल, मापाडी, आडते, व्यापारी व कर्मचारी यांची बैठक घेवून विविध अडचणीवर चर्चा केली.

समितीच्या नेप्ती मार्केटमध्ये होणा-या कांदा लिलावामध्ये सुसुत्रता आणणेसाठी चर्चा करण्यात आली. सध्या नेप्ती मार्केटमध्ये १०३ आडते व्यवहार करत असून एकूण ११७ मापाडी आहेत. सद्य परिस्थितीत आडत्यांच्या पद्धतीनेच लिलाव सुरू असून एकाच वेळी अनेक ठिकाणी आडते लिलाव चालू करतात. त्यामुळे खरेदीदाराला प्रत्येक ठिकाणी लिलावास उपस्थित राहाता येत नाही. यामुळे कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शनिवार दि. ३० नोव्हेंबरपासून नेप्ती कांदा मार्केटमध्ये रोटेशन पद्धतीने लिलाव सुरु करण्यात आले. पहिल्याच लिलावाला सुमारे २० हजार गोण्यांची आवक झाली होती, तर या लिलावात गावरान कांद्याला ८२ रुपये किलो व लाल कांद्याला ६२ रुपये प्रतिकिलोचा उच्चांकी दर मिळाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post