नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी २५० ट्रॅक्टर, २१ कार, ४०० वर दुचाकींची विक्री; ३० कोटींची उलाढाल, ७० टक्के खरेदी रोखीने
माय नगर वेब टीम
कळवण -गेल्या पाच वर्षांपासून १०० ते ५०० रुपये क्विंटलच्या दरम्यान राहणाऱ्या कांद्याच्या भावाने यंदा तब्बल दोन महिने दोन हजार ते चार हजार रुपये क्विंटल एवढा भाव दिल्याने जिल्ह्यात कांद्याचे सर्वात मोठे क्षेत्र असणाऱ्या कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. त्यामुळे एकीकडे जगभरातील वाहन बाजारपेठेत मंदीमुळे मरगळ आली असताना आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या एकट्या कळवणमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच माळेलातब्बल २५० ट्रॅक्टर, २१ कार आणि ४०० ते ५०० दुचाकींची विक्री झाली असून तब्बल ३० कोटींची उलाढाल झाली अाहे. विशेष म्हणजे यातील ७० टक्के खरेदी ही रोखीने असल्याने कळवणने देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
बाजारपेठेत कुठलाही उत्साह नसताना कळवणमधील शेतकऱ्यांनी मात्र आपल्या खरेदीने एक सुखद वातावरण तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी होत असल्याने एका ट्रॅक्टर कंपनीचा एम. डी. तर काहींचे व्यवस्थापक खास या कार्यक्रमासाठी कळवणला आला. ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम एका एसी हॉलमध्ये ठेवण्यात आला. सुरुवातीला शेतकऱ्यांना एमडी व व्यवस्थापकांच्या हस्तेच फेटे बांधत वाजत- गाजत गावातून त्यांची मिरवणूक तर काढण्यात आलीच शिवाय साग्रसंगीत गोड- धोड जेवनावळीचाही कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. एक- दोन ट्रॅक्टर कंपनींनी तर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण, माहिती देणारी कार्यशाळाही घेतली. कळवण तालुक्यात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा येथील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे आहेत. कांदा हे प्रमुख पीक असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या चार ते ५ वर्षांपासून नीचांकी दराने कांदा विकावा लागत होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र, यावर्षी कांद्याने गेल्या दोन महिन्यांपासून चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांकडे असलेल्या कांदा चाळींमुळे आजही शेतकऱ्यांकडे कांदा टिकून आहे.
Post a Comment