बेकायदा दारू विक्रेते, वाळूतस्करांना ‘बुरे दिन’
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नियमबाह्यरित्या मद्यविक्री केल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, संगमनेर, अकोले, राहुरी, नगरमधील 22 अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा कार्यालयाला दिले असून तात्काळ त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत संबंधित अनुज्ञप्तीधारकांना तीन दिवसांत त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असते या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन पुणे विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांत आचार संहितेच्या कालावधीत या विभागामार्फत अनुज्ञप्तीचे सखोल निरीक्षण केले असता अनुज्ञप्तीमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांच्याविरुध्द विभागीय प्रकरण नोंदविण्यात आले असून नियमबाह्य मद्य विक्री केल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खालील 22 अनुज्ञप्त्या तात्काळ बंद केल्या असून त्यांना तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
नेवासा, पारनेर व बेलवंडीत अवैध वाळू जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा, पारनेर व बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्या विरोधात कारवाई करत 2 जेसीबी, 1 ट्रॅक्टर, 2 डंपर, वाळू असा एकूण एक कोटी 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार सोमवार (दि. 14) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार विजयकुमार वेठेकर, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, प्रकाश वाघ, रणजित जाधव, रोहित मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, शिवाजी ढाकणे यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये नेवासा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईत 60 लाख 30 हजार रुपये किंमतीचा एक विना नंबरचा जेसीबी, एक डंपर (क्र. एमएच- 20 सीटी- 4708) व यातील चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोरख नामदेव धनवडे (वय- 29 रा. गंगापूर ता. नेवासा) व रवींद्र रमेश जाधव (वय- 28 रा. चिंचबन ता. नेवासा) यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईत 35 लाख 10 हजार रुपये किंमतीचे एक विना नंबरचा जेसीबी, एक न्यू हॉलंड ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास वाळू जप्त करून मारुती सोनाजी तोडकर (वय- 20 रा. देवठाणा ता. पुसद जि. यवतमाळ) व अज्ञात ट्रॅक्टर मालक यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईत 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचा एक एल पी ट्रक, (क्र. एमएच- 12 एफझेड- 6483) व चार ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करून अज्ञात व्यक्तीवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दमणची 18 लाखांची दारू कामरगाव घाटात पकडली
15 ऑक्टोबर 2019 रोजी अहमदनगर पासून कामरगाव घाटापर्यत आयशर कपंनीचा मॉडेल 1110 चा ट्रक क्र. जी जे 01 एचटी 1262 या वाहनाचा पाठलाग करुन कामरगाव घाटात वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये प्लॅस्टिकने भरलेल्या गोण्याखाली दडवून ठेवलेल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला व दमण राज्यात निर्मित विक्रीस असलेला विदेशी मद्य 18 लाख 48 हजार 400 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
Post a Comment