'पुढीच्या वर्षी शेती व लक्ष्मीला पिडा नाही'



निमगाव वाघात होईकासाठी पशु हत्येवर बंदी ग्रामस्थांचा निर्णय । होईक ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम नुकताच पार पडला. या वर्षीपासून होईकासाठी पशु हत्येवर बंदी घालून देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर पुढील वर्षीसाठी शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याचे भाकित वर्तविल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगताना भगत भुसारे म्हणाले की, दाही खंडामध्ये रक्ताचा पुर वाहणार म्हणजे युध्द किंवा नैसर्गिक संकट ओढवणार. लक्ष्मीला पिडा नसून, बाळाला संकट आहे. चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस आभाळ फिरेल व ज्वारीच्या पिकाला अपकार होईल. दिवाळीच दिपान पाच ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस होईल. सटीच सटवानने कर्मभागी पाऊस होणार आहे. जेठुडी कठिण जाईल तर गायी देठाला लागून, नव तूप होणार असल्याची भविष्यवाणी सांगत आषाढीला पाऊस होऊन मुगराळ्याची पेर होईल तर ज्वारीची पेर होऊन घडमोड होणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तविले. तसेच गहू, हरबर्‍याचे पेर होणार असल्याचे स्पष्ट करुन सोन्यासह अन्नधान्याचे पुढील वर्षीचे बाजारभाव देखील त्यांनी सांगितले.
भुसारे यांनी मागील वर्षी सांगितलेले भाकित यावर्षी खरे ठरल्याने भविष्यवाणी ऐकण्यासाठी निमगांव वाघा, चास, पिंपळगाव वाघा, जखनगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने आदी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. गावातील भविष्यवाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पै.नाना डोंगरे, विठ्ठलराव दातीर, बाबा जाधव, गोकुळ जाधव, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, संजय डोंगरे, रावसाहेब भुसारे, बशीर शेख, रामदास वाखारे, बाळासाहेब भुसारे, एकनाथ भुसारे, शिवाजी पुंड, बाबा चारुडे, राजेंद्र भुसारे, मयुर काळे, ठकाराम शिंदे, युवराज भुसारे, नवनाथ जाधव, अंबादास निकम, सुरेश जाधव, संतोष बनसोडे, छगन कापसे, बाळू बोडखे, मोहन गावडे, रमेश गावडे, मच्छिंद्र गावडे, रावसाहेब टिक्कल, संदिप गिरगुणे, भरत फलके यांनी परिश्रम घेतले. भाविकांसाठी गावात भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post