राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बारा हजार जागांची भरती






मुंबई - देशातील 17 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिकपदाच्या 12 हजार 75 जागांची भरती होणार आहे, त्यासाठी इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) वतीने डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 ऑक्टोबर 2019 आहे. देशातील बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युको बँक, कार्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया अशा 17 बँकांचा यामध्ये समावेश असून महाराष्ट्रातील 1203 जागांचा यामध्ये समावेश आहे.

या पदासाठी 1 सप्टेंबर 2019 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय किमान 20 व कमाल 28 वर्षे असावे. अनुसूचित जाती, जमातीसाठी पाच वर्षे, ओबीसीसाठी 3 वर्षे, माजी सैनिकांसाठी, विधवा, परित्यक्तांसाठी शासन नियमानुसार वयात सवलत आहे. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही शैक्षणिक अर्हता असून या भरतीच्या पूर्वपरीक्षेसाठी इंग्रजीकरिता 30 गुण, अंकगणित व आकलन क्षमता या विषयांसाठी प्रत्येकी 35 गुण अशी 100 गुणांची, तर मुख्य परीक्षा सामान्य व आर्थिक ज्ञानासाठी 50, इंग्रजी विषयासाठी 40, तर आकलन क्षमता व संगणकीय ज्ञानासाठी 60 गुण व ऍप्टिट्यूडसाठी 50 गुण अशी 200 गुणांची परीक्षा होणार आहे.

बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर ऍकॅडमीचे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक, विधवा, अपंगांसाठी 100 रुपये, तर उर्वरित सर्वांसाठी 600 रुपयांचे परीक्षा शुल्क आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी आयबीपीएसच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post