‘साकळाई’च्या सर्व्हेचा आदेश निघाला पण हा 'विधानसभे'साठीचा बबल तर नाही ना?




निलेश आगरकर @ माय नगर

नगर - श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांना वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश सुप्रमाध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवार 3 सप्टेंबर रोजी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा दिवसांनतर कोणत्याही क्षणी लागू शकते. असे असतांना आत्ता साकळाई योजनेचा सर्व्ह करण्याचा आदेश काढला आहे. दहा दिवसांमध्ये सर्व्हे होवून योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार का? असा सवाल साकळाई योजनेतील लाभधारक उपस्थित करत आहेत. यापूर्वी अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या साकळाईचा फक्त राजकाणासाठी वापर झाला. आताही विधानसभा निवडणुकीसाठी साकळाईचे पुन्हा गाजर तर नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


साकळाई मंगळवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद व साकळाई कृती समिती सदस्य यांची बैठक झाली.
गेल्या वर्षभरापासून साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई योजनेतील लाभधारक शेतकर्‍यांनी लढा उभारला आहे. त्यासाठी गावोगावी जावून जनजागृती अभियान राबविले. तसेच ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकीमध्ये जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीपूर्वी साकळाई उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली जाईल असे स्पष्ट केले होते. लोकसभा निकालानंतरही साकळाईबाबत सरकारस्तरावर हालचाली न झाल्याने साकळाई कृती समिती व अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुन्हा गावोगावी जावून जनजागृती अभियान राबविले. तसेच साकळाई मार्गी न लागल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान क्रांती दिनी जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण केले. साकळाई योजनेबाबत मंत्रालयात बैठक घेवून मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याने अभिनेत्री यांनी उपोषण मागे घेतले. गेल्या आठवड्यात मंत्रालयात ना. राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी बैठक घेत साकळाई योजना कशी मार्गी लावता येईल यासाठी त्रीसदस्यीय समिती नेमून तात्काळ अहवाल देण्यास सांगितले. मंगळवार 3 सप्टेंबर रोजी पुन्हा मंत्रालयात गिरीष महाजन यांनी अभिनेत्री सय्यद व साकळाई कृती समितीचे सदस्य यांची बैठक घेतली असून यामध्ये सकारात्मक निर्णय झाला आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठीचा प्रस्ताव महामंडळाकडून शासनास सादर करण्यात आलेला होता. याबाबतचा निर्णय शासनाकडे प्रलंबित आहे. बैठकीत मंत्र्यांनी पाणी उपलब्धतेच्या अधीन राहून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्वेक्षणाला 2.34 कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये समांतर पाईपलाईनचे सर्वेक्षण व संकल्पन करणे, मुख्य रायझींग मेन, पंप हाऊस व लाभक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठीच्या बाबींचा समावेश आहे.
दरम्यान यापूर्वी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार यांनी साकळाई योजना व्हावी यासाठी प्रयत्न केले. पण साकळाई योजना झाली नाही. लोकसभा, विधानसभा निवडणूक आली की या योजनेचा गाजावाजा होतो. आरोपांच्या फैरी झडतात, पण यातून आत्तापर्यंत काहीच साध्य झालेले नाही. आता कोणत्याही परिस्थितीत योजना मार्गी लावायचीच या दृष्टीने 35 गावातील शेतकऱ्यांची साकळाई योजना कृती समितीने मोट बांधली आहे. याला कितपत यश येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाणी उपलब्ध झाल्यासच साकळाईचा विचार
29 ऑगस्ट रोजी मंत्रालयातील नियामक मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या चर्चेनुसार दुसर्‍या कृष्णा पाणी तंटा लवादानुसार कुकडी खोर्‍यामध्ये अतिरिक्त तीन टीएसी पाण्याची तरतूद आहे. मात्र लवादाचा अंतिम निवाडा झालेला नाही. जर हे पाणी उपलब्ध झाले तर या अतिरिक्त पाण्याचा वापर साकळाई प्रकल्पासाठी करता येईल अशी चर्चा झाली. कुकडी डाव्या कालव्याला सांतर पाईपलाईनद्वारे अथवा एक्सप्रेस कॅनॉलद्वारे विसापूर धरणात पाणी आणणे व साकळाई योजना कार्यान्वित करणे, कुकडी घोड नदीमधून पावसाळ्यामध्ये घोड धरण (चिंचणी) येथे सोडणे व ते पाणी घोड धरणातून, घोड नदीमधून विसापूरसाठी, साकळाईसाठी उचलणे व साकळाई योजना कार्यान्वित करणे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post