माय नगर वेब टीम
बारामती : बारामतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहोचली असून यात्रेदरम्यान राष्ट्रवादी चे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला. यामुळे संतप्त होत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला, पोलिसांना सौम्य लाठीमार करत गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात्रा पुढे गेल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली, त्यापेक्षा अधिक कामं युती सरकारनं केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
तर पवारांनी चूक केल्यानंच आज राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण आटोपतं घेतलं.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तर वर्षांमध्ये जे 370 कलम रद्द झालं नाही ते आत्ता रद्द झालं. नरेंद्र मोदी नावाचा वाघ त्यासाठी होता. गळती लागलीय कारणं बुरे काम का बुरा नतीजा बुरा होता है, असा टोला त्यांनी लगावला. आमच्या सरकारने सगळंच केले असं नाही, पण आम्ही पाच वर्षांत केलेली कामं बघा आणि यांनी केलेली 15 वर्षांतील कामं बघा. आमची कामे जास्त आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
यांच्याकडे प्रचंड गळती लागलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ही भाजपसोबत आहेत, असेही ते म्हणाले.
'त्या' कार्यकर्त्यांची धरपकड
बारामती शहरात एमआयडीसी परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत गोंधळ घालण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी मासाळ, युवती अध्यक्ष भाग्यश्री धायगुडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष पार्थ गालिंदे, विद्यार्थी अध्यक्ष उत्कर्ष गलांडे,धनगर आंदोलक पंकज देवकाते,युवक तालुका उपाध्यक्ष किरण कारंडे,युवती सरचिटणीस रोहिणी अटोळे,भाग्यश्री सुर्यवंशी, शुभम मोरे, दादा शिरसठ यांना पोलीसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केले होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांना बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले व महाजनादेश यात्रा पुढे गेल्यावर त्यांना सोडण्यात आले.
Post a Comment