माय नगर वेब टीम
अहमदनगर – कोपरगाव येथील शेतकर्याच्या जमिनीची नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणावरून नगरच्या जिल्हाधिकार्यांच्या दालनातील 29 खुर्च्या जप्त करून त्या न्यायालयात जमा करण्यात आल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कारसह निघून गेल्याने त्यांची कार जप्तीची कारवाई मात्र टळली.
कोपरगावचे माजी उपनगराध्यक्ष वाल्मिकराव कातकडे यांची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी घेतली. गेल्या 17 वर्षांत न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही त्याची नुकसान भरपाईची रक्कम बांधकाम विभागाने दिलेली नव्हती. अखेर न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाची तक्रार कातकडे यांनी केली. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत. भूसंपादन जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने होते. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. तिथेही न्याय मिळत नसल्याने कातकडे यांनी न्यायालयात दावा केला.
न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने जिल्हाधिकार्यांची खुर्ची व कार जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार कातकडे व अॅड. बी. सी. सातव शनिवारी नगरला आले. न्यायालयातून बेलिफ घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. ते येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाचा आदेश आणि कारवाईसाठी बेलिफ बरोबर असल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नुकसान भरपाईच्या मदतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाण्याचा सल्ला कातकडे यांना दिला. परंतु आदेश जिल्हाधिकार्यांच्या विरोधात आहे. 65 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची व्यवस्था जिल्हाधिकार्यांनी करावी, असा आग्रह अॅड. सातव यांनी धरला. जिल्हाधिकारी तेथून निघून गेले. कातकडे व अॅड. सातव यांनी लगेच एक टेम्पो मागवून जिल्हाधिकार्यांची तसेच त्यांच्या दालनातील अन्य अशा 29 खुर्च्या जमा करून त्या टेम्पोत टाकल्या. टेम्पो न्यायालयात नेऊन तिथे या खुर्च्या जमा करण्यात आल्या.
Post a Comment