माय नगर वेब टीम
अहमदनगर - छावणीच्या कारणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला असल्याचे निदर्शनात येत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
घोसपुरी येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दरम्यान गावातील चारा छावणी बंद केल्यामुळे वसंत झरेकर यांनी आत्महत्या केली असून यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या पुढाकारात जिल्हा शासकीय रुग्णालयात ठाण मांडले. अखेर विधानसभेचे उपसभापती विजय औटी व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत मध्यस्थी करीत याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली जाईल, अशी आंदोलकांची समजूत काढली व विंनती केली. त्यानंतर आंदोलन मागे घेतले . शवविच्छेदन प्रक्रियेनंतर झरेकर यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा घोसपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवारी वसंत झरेकर यांनी विष घेऊन आत्महत्या केली. चारा छावणी बंद केल्यामुळे ही शेतकरी आत्महत्या झाली असून या प्रकरणी तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर , तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र भगत, अशोक झरेकर, सोमनाथ झरेकर, प्रकाश कुलट, प्रवीण कोठुळे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सरकारच्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या अकरा छावण्यांची मान्यता जिल्हा प्रशासनाने रद्द केली होती. २६ जुलैपासून या छावण्या बंद करण्याचे प्रशासनाने आदेश दिले होते. यामध्ये कर्जत तालुक्यातील सात व नगर तालुक्यातील चार छावण्यांचा समावेश होता. नगर तालुक्यातील चार चारा छावण्या बंद झाल्यामुळे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे महामार्गावर बायपास चौकात शेतकऱ्यांनी जनावरांसह रास्तारोको आंदोलन केले होते. तसेच नगर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनाने मान्यता रद्द केलेल्या छावण्या पुन्हा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते. छावण्या सुरू करण्यासाठी छेडण्यात आलेल्या या आंदोलनात वसंत झरेकर सहभागी होते. दरम्यान याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने खुलासा केल्यानंतरही आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
मुख्यमंत्र्यांकडे वस्तुस्थिती मांडणार
आंदोलनाची दखल घेत विधानसभेचे उपसभापती विजय औटी व राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘चारा छावणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाणे आवश्यक होते. पण त्यांनी घटनास्थळी न जाता निष्काळजीपणा दाखवला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. शासनाची भूमिका शेतकऱ्यांना मदत करायची आहे. पण काही अधिकाऱ्यांकडून शासन निर्णयाची अहवेलना करीत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, माजी खासदार दादा पाटील शेळके, शहर प्रमुख दिलीप सातपुते, डॉ दिलीप पवार, यांच्यासह घोसपुरी ग्रामस्थ, शेतकरी यांच्यासोबत ना. विखे पाटील व ना. औटी यांनी चर्चा केली. याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असे त्यांनी आंदोलक व ग्रामस्थांना सांगितले.

Post a Comment