माय नगर वेब टीम
अहमदनगर:– साकळाई पाणी योजनेसाठी उपोषण करू नका, म्हणून माजी मंत्री आणि काही आमदारांच्या मला धमक्या येत आहेत. पण मी साकळाई योजना मार्गी लागण्यासाठी लढणारच, मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही, योजनेसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून आमरण उपोषण करणारच आहे, असे सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. अभिनेत्री सय्यद यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान श्रीगोंदयातून विधानसभा लढवण्याचा निर्णय तूर्तास तरी नाही, असे त्या म्हणाल्या.
सय्यद म्हणाल्या की, 35 गावांना निर्णायक ठरणारी साकळाई पाणी योजना सुरू व्हावी, यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून दीपाली सय्यद यांच्यासह 35 गावातील गावकरी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसणार आहेत. यासाठी गेल्या दीड महिना दीपाली सय्यद व साकळाई पाणी योजना कृती समिती सदस्य जनजागृती करीत होते. मात्र या काळात श्रीगोंदा तालुक्यातील काही आमदार व माजी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन उपोषण करू नका, असा दबाव आणला आहे. मात्र कोणत्याही धमक्यांना न घाबरता जनतेच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे दीपाली सय्यद यांनी सांगितले आहे.
सय्यद यांच्या आरोपाचा रोख श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील नेमक्या कोणत्या राजकीय नेत्यावर आहे..यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सय्यद यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यांना धडा शिकवणार
साकळाई योजनेसाठी आत्तापर्यंत कोणी काय प्रयत्न केले आहेत ते सर्वांना माहीत आहे. साकळाई च्या नावावर आमदार झाले काही मंत्री झाले, पण साकळाई योजना मार्गी लागली नाही. साकळाई साठी अभिनेत्री उपोषण करत असताना त्यांना धमक्या देने अत्यंत चुकीचे आहे. त्या धमक्या देणाऱ्यांना शेतकरी जागा दाखवतील असा सूचक इशारा साकलाई कृती समितिच्या सदस्यांनी दिला आहे.
Post a Comment