सोनई-करजगाव पाणी योजना चार दिवसात सुरू होणार ; माजी.आ.गडाख यांच्या आंदोलनास यश





त्या गावांची नळ जोडणी बंद करण्याबाबत स्वतंत्र होणार बैठक

माय नगर वेब टीम

अहमदनगर -

गत पंधरा दिवसापासून या ना त्या कारणानं बंद असलेल्या सोनई-करजगावसह 17 गावांची पाणी योजनेस चार दिवसात पाणी सोडणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी 23 जुलै रोजी माजी आमदार शंकरराव गडाख व सोनई ग्रामस्थांना लेखी तआश्वासन दिले.

पंधरा दिवसापासून योजनेचे पाणी बंद होते. यासाठी गत शनिवारी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सतरा गावातील लाभधारकांनी राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर रास्ता-रोको आंदोलन केले होते. याप्रकरणी चार दिवसांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सुमारे बाराशे जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पाणी योजना कोणत्याही परिस्थितीत चालू करणार असा चंग बांधलेल्या माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अखेर मंगळवार 23 जुलै रोजी नगरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान लाभधारकांनी भजन गात परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांनी तर, जीवन प्राधिकरणच्या इमारतीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आंदोलनाची आक्रमकता पाहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाणी योजनाबाबत नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत फोनद्वारे कळविले. 4 दिवसात पाणी योजना सुरू करू असे लेखी आश्वसन त्यांनी दिले. दरम्यान 27 जुलै रोजी पाणी योजना सुरू करणार असल्याचे नाशिकचे मुख्य अभियंता लांडगे यांच्याशी शंकरराव गडाख यांची फोनवरून चर्चा झाली. राहिलेले अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच नासिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासमवेत गडाख व सर्व गावातील सरपंचाची बैठक होणार आहे. याशिवाय ब्राम्हणी , उंबरे व पिंप्री येथील नळ जोडणी बंद करण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post