'साकळाई'चा गैरवापर करू नका ; अन्यथा धडा शिकवू- कृती समितीचा सणसणीत इशारा



माय नगर वेब टीम

अहमदनगर- साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. मुंबई येथील बैठकीत जलसंपदा मंत्र्यांनीही साकळाई होणारच असे सांगितले आहे. तरीही अभिनेत्री दिपाली सय्यद साकळाई साठी ९ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहेत. ही त्यांची राजकीय नौटंकी आहे. त्यांच्या गावोगावच्या सभांना होणारी गर्दी ही मराठी सिने अभिनेत्री म्हणून होत आहे. अशी घणाघाती टिका करतानाच त्यांच्या उपोषणास आमचा पाठींबा असणार नाही. असेही सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 'साकळाई'चा राजकारणासाठी गैरवापर करू नका, अन्यथा चांगलाच धडा शिकवू असा इशाराही कृती समितीने दिला आहे.




हॉटेल यश पॅलेस येथील आयोजित पत्रकार परिषदेवेळी जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी, संतोष लगड, सरपंच सुरेश काटे, रामदास झेंडे, झुंबरराव बोरूडे, बाळासाहेब लोखंडे, सतिश चौधरी, बाळासाहेब गाडगे, राजेंद्र माळदकर, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना समितीतील सदस्य रामदास झेंडे म्हणाले की ही योजना मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री सकारात्मक आहेत मग दिपाली सय्यद यांनी उपोषण करण्याची आणि गावोगाव सभा घेण्याची काय गरज आहे. तर संतोष लगड म्हणाले की आजवर साकळाई योजना फक्त निवडणूकी पुरतीच आजवरच्या सर्व नेत्यांनी वापरली पण त्यासाठी काहीही केले नाही. नुकताच आमदार राहूल जगताप यांनी लक्षवेधी सुचना विधानसभेत केली ती ही राजकीय हेतूनेच आहे. सतिश चौधरी यांनी दिपाली सय्यद या गुंडेगावला वृदधाश्रम बांधला असे सगळीकडे सांगतात पण त्या वृदधाश्रमाची एक विटही रचली गेलेली त्यांनी दाखवावी. रूई छत्तीसी येथील आंदोलनात येवून ४०० कोटी देवू म्हणाल्या त्याचे पुढे काय झाले. मग साकळाई बाबत त्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा. दिपाली सय्यद या भाषणात सांगतात की कृती समितीच्या लोकांवर राजकीय दबाव आहे पण आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. दिपाली सय्यद यांचा साकळाई लढा हा राजकीय हेतूने प्ररित आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा नाही.साकळाई बाबत नामदार राधाकृष्ण विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दिपाली सय्यद यांच्या उपोषणास कृती समितीचा पाठींबा असणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post