रायतळे ते अस्तगाव रस्त्याची दुर्दशा, दुरुस्ती न केल्यास लखन साळे यांचा आंदोलनाचा इशारा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - रायतळे ते अस्तगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेले असल्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांचे अपघात होत आहेत. गेल्या काही दिवसांत हे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, या मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांना जनआधार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी लखन साळे, अंकुश ठोकळ, प्रकाश पोटे, रमेश दळवी, वजीर सय्यद, आकाश चत्तर, रवींद्र शेटे, कारभारी साळवे, सचिन भालेकर, सागर बोडखे, नीलेश सातपुते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील रायतळे ते अस्तगाव मार्गावर रस्त्याची चाळण झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे चारचाकी व दुचाकीचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे पडल्याने व रस्ताच न उरल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. पादचारीही या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची अवस्था त्यामुळेच खूपच दयनीय झाली आहे. तरी या रस्त्याचे काम तातडीने करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
15 दिवसांच्या आत रायतळे ते अस्तगाव रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास येथील समस्या दूर करून खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Post a Comment