पुन्हा वादळासह पावसाची शक्यता ; खबरदारी घेण्याचे आवाहन




अकोले तालुक्यात सर्वाधिक पाऊस
माय नगर वेब टीम

अहमदनगर




हवामान खात्याने वर्तवलेल्या आंदाजानुसार जिल्ह्यात ठिक-ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक अकोले तालुक्यात 120 मिलीमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ राहाता, कोपरगाव,नगर, शेवगाव, राहुरी तालुक्यात वादळी पावसाचा शिडकाव पडला. जिल्ह्यात 5.17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून बुधवार रोजी देखील वातावरण असेच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नाशिक, पुणे व नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळांसह पावसाची शक्यता हावामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.
विजांचा कडकडाटसह अकोले तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याध्ये 120 मिलीमीटर पाऊस हा अकोले तालुक्यात पडला आहे. तसेच नगर येथील सावेडी महसूल मंडलात आकोले पाठोपाट 58 मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली. शहरात पाऊसाचे आगमन सोमवारी दुपारी दोन वाजता झाले. वादळी पावसामुळे नगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली. तर महावितरण विभागाचे खांब पडले.
रविवारी, सोमवार रोजी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अकोले तालुक्यातील राजूर, अकोले, शेंडी, ब्रम्हाणवाडा, समशेरपूर, कोतूळ व साकीरवाडी महसूल मंडळात पाऊसाची नोंद झाली. तर नगर तालुक्यातील सावेडी, नालेगाव, कापूरवाडी, केडगाव, चास, भिंगार, नागापूर व चिचोंडी पाटील परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस बरसला. कोपरगावासह पोहेगाव, सुरेगाव व दहिगाव बोलका या गावात पावसाचा शिडगाव पडला. बुधवारी देखील वातावरण असेच राहील, असा इशारा हवाान विभागाने दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


जिल्ह्यात वादळी वार्‍याचा तडाखा

संगमनेर तालुक्यात रविवारी (दि. 9) रोजी झालेल्या अवकाळी पावसात अंगावर वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला. तसेच 7 घरांचे अंशत: नुकसान झाले. तर नगर तालुक्यात रविवार व सोमवार रोजी वाळकी येथील घोडके यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. तसेच शाळेच्या दोन खोल्यांचे पत्र देखिल उडून गेले असल्याचे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे. तर सोमवारी (दि.10) रोजी दुपारी बुर्‍हाणनगर, नारायणडोहो, चिचोंडी पाटील येथील घराचे पत्रे उडून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नगर शहारामध्ये एका रिक्षावर हायमॅक्सचा पोल पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
राहुरी तालुक्यात रविवार(दि.9) रोजी राहुरी (बु.) येथे 5 घरांचे नुकसान झाले आहे. तर बारागाव नांदुर येथे 2 घरांचे नुकसान झाले आहेत. तर पारनेर तालुक्यात जवळे, राळेगण थेरपाळ व पिंपळनेर येथे फळपिकांचे 55 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अकोले तालुक्यात धामणगाव फाटा येथे विज पडून एक बैल दगावला आहे. तर शरणखेल येथे एका घराची पडझड झालेली आहे. तसेच नवलेवाडी, आगस्ती नगर, उंचखडक, मनोहरपुर, रुभोडी, कुंभेफळ, रेडे, सुगाव बु, टाकळी, खानापुर, गर्दणी याठिकाणी 5 ते 10 घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post