पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीत शासनाच्यावतीने साजरी करावी - विक्रम ढोणे
माय नगर वेब टीम
अहमदनगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) या त्यांच्या जन्मगावी शासनाच्यावतीने साजरी करावी, तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
आदर्श महिला राज्यकर्त्या, लोककल्याणकारी राज्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीत 31 मे रोजी त्यांच्या जयंतीसाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो लोक येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना या कार्यक्रमाला आले आहेत. सरकार अहिल्यादेवींच्या विचाराने चालेल, असे फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सांगितले आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर अहिल्यादेवी जयंती राज्य शासन चौंडीत साजरी करेन आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवून अहिल्यादेवींना अभिवादन करतील, अशी अहिल्याप्रेमींची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून चौंडीत एकदाही जयंतीच्या कार्यक्रमाला आलेले नाहीत.
राज्य शासनाने 27 मे 2016 रोजी निर्णय करून 31 मे रोजी सर्व शासकीय कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले. पण शासनाच्यावतीने अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी येथे जयंती कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. शिवजयंतीप्रमाणे चौंडीतही शासनाच्यावतीने अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.

Post a Comment