लुटारू पंतप्रधानाला पुन्हा सत्तेत बसवू नका - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर.


कोपरगाव (प्रतिनिधी) :-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लुटारू आहेत आणि जनतेने अशा लुटारू पंतप्रधानाला सत्तेत बसवु नये. व गेल्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

उमेदवार संजय सुखदान, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण, दिशा शेख, दक्षिणेतील उमेदवार सुधाकरराव आव्हाड, डॉ. अरुण साबळे, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे, महासचिव सुनिल शिरसाठ, भारीपचे उत्तर जिल्हाध्यक्ष किरण साळवी, एम.आय. एम. चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, भारीपचे अहमदनगर दक्षिण शहर महासचिव सुनिल शिंदे, युवा अध्यक्ष योगेश साठे, , जेष्ठ नेते दशरथ गायकवाड, सूर्यभान गोरे, भास्करराव येलमामे, अ‍ॅड. नितीन पोळ, दादासाहेब साठे, सोपान महापूर, संजय दुशिंग आदी यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, मागील तीन वेळा काँग्रेस राष्ट्रवादी चे उमेदवार शिर्डी मतदार संघात निवडून आले नाहीत. रामदास आठवले यांचा पराभव देखील यांनीच केला. असे सांगून राजकारणातील पळपुटेपणा राहुल गांधी बारामतीतून शिकले की काय ? अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटांबंदी व नोटा बदलीचा निर्णय देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा ठरला. प्रत्येक गोष्टीला जसा अंत असतो तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजकीय अंत होणार आहे. त्यांना लवकरच 'अलविदा......मोदी' असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इथल्या सुशिक्षित, अनुभवी व जाणकार लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. ही लोकसभा निवडणूक म्हणजे गेल्या वेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची नामी संधी आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवार संजय सुखदान म्हणाले, मी बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले नाही मात्र आज मला बाळासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला त्यामुळे माझे पांग फिटले. अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करून बाळासाहेबांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करण्याची संधी दिली हा मी माझा सन्मान समजतो. शिर्डी लोकसभा मतदार संघात रोजगाराचा प्रश्न, ऐरणीवर असून औद्योगिक वसाहतीचे जाळे निर्माण करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे ते म्हणाले. शिर्डी लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना युती चे प्रतिस्पर्धी उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उल्लेख मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर असे करताच सभा मंडपात टाळ्या व शिट्ट्यांचा गजर झाला.

प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, आदरनिय बाळासाहेब आंबेडकर यांनी देशातील आणि राज्यातील वंचित घटकांध्ये स्वाभिमान पेरण्याचे काम केले. आपल्यातील आत्मविश्वास जागृत करण्याचे काम केले. त्यामुळे इथून पुढे आम्ही कोणीही प्रस्थापित कारखानदारांच्या दारात जाणार नाही, गुलामगिरी पत्करणार नाही. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून साखर सम्राटांची मस्ती जिरवू. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्याच पालख्यांचे भोई होऊ, सतरंज्या उचलू आणि सत्तेच्या दिशेने वाटचाल करू.

यावेळी दिशा शेख म्हणाल्या की, राज्याला आणि देशाला वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही यापूर्वी आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी कुचकामी ठरले त्यामुळे इथून पुढे आपला मार्ग आपनच शोधुया, आपला विकास देखील आपणच करूया आणि आपले हक्काचे लोकप्रतिनिधी सत्तेत पाठवूया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. परवेज अशरफी, रामचंद्र भरांडे, दशरथ गायकवाड, सूर्यभान गोरे, भास्करराव येलमामे, वर्षाताई बाचकर, सोपान महापूरे, संघराज रुपवते यांचीही भाषणे झाली.

महापुरुषांना अभिवादन करून या प्रचारसभेस प्रारंभ झाला. शाहीर विलास खरात आणि सहकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीची गाणी सादर केली. डॉ. जालिंदर घिगे यांनी प्रस्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. किरण साळवी यांनी आभार मानले.

या प्रचार सभेच्या यशस्वीतेसाठी विजय त्रिभुवन, राहुल खंडिझोड, विशाल कोळगे, तैफिक भाई मणियार, अबुबकर मणियार, साजिद मिर्झा, समीर बेग, इम्रान देशमुख, नितीन शिंदे, अजय विघे, संजय दुशिंग, अविनाश शिंदे, शरद खरात, अतिष त्रिभुवन, स्वप्नील दुशिंग, राजेंद्र उशिरे, रणजित खरात, आनंद कोपरे, सचिन धिवर, राहुल गायकवाड, महेश पवार, राजेंद्र रनशूर, अजित झोडगे आदींनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post