माझ्या विजयामागे सर्वसामान्यांची ताकद; विरोधकांनी दहशत शिकवू नये, बँकेतील अनियमितता बाहेर काढण्याचा निर्धार



जिल्हा सहकारी बँकेतील विजयानंतर खासदार नीलेश लंके यांचा पारनेर येथील विजयी सभेत विरोधकांना इशारा / 

माय नगर वेब टीम 

पारनेर - अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व प्रस्थापित शक्ती एकवटलेल्या असतानाही सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर विजय मिळविला आहे. सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हीच आपल्या विजयाची खरी ताकद आहे. बँकेत शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असून, दहशत आणि दादागिरीच्या राजकारणाला भीक घालणार नाही, असा ठाम निर्धार खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पारनेर येथे आयोजित विजयी सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी निवडणुकीतील संघर्ष, मतदारांचा विश्वास, विरोधकांकडून करण्यात आलेले प्रयत्न, पोलिस प्रशासनाचा वापर, बँकेतील कथित अनियमितता आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत परखड भूमिका मांडली.

खासदार लंके म्हणाले, सर्वसामान्य लोक मला मदत करतात. मोठ्यांना मात्र माझा त्रास होतो. मी एकटा या निवडणुकीत विजयी झालो असलो, तरी बँकेत काम करण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. तुमच्या आशीर्वादाने चक्रव्यूह भेदून मी विजयी झालो आहे. मी मागच्या दाराने येणारा नाही. ‘जो टायगर होता है, वो अकेला आता है,’ असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. आपण विजयी होणार नाही, असे सांगणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिले आहे. तुम्ही मला रोखणारे कोण? हा स्वाभिमानी तालुका आहे. पैशांचे आमिष दाखविण्यात आले; मात्र मतदारांनी त्याला नकार दिला. परक्यांनी लक्ष घातल्याने मतदार अधिक जागरूक झाले, असे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली. उद्धव साहेबांची शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना अशा विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहिले. माझे कोणाशीही वैर नाही. ज्याच्याशी वैर करतो त्याच्याशी वैरच करतो आणि ज्याच्याशी मैत्री करतो त्याच्याशी मैत्रीच करतो. गद्दारी करणे आपल्या स्वभावात नाही. माझी मते ७० झाली असती; मात्र थोडा उशीर झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 बँकेचे ठराव सुरू झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ठरावासाठी पोलिस प्रशासनाचा वापर करण्यात आला. आज ना उद्या सत्ता बदलणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणाचीही लाचारी पत्करू नये. नीलेश लंकेही गृहमंत्री होऊ शकतो, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. जो आम्हाला नडला, त्याला पाडल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 ज्या प्रकाश गाजरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, त्यांनीही मतदारांचे संपर्क क्रमांक पाठवून आपली निष्ठा कायम ठेवली. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले. छुपे डाव खेळण्यापेक्षा समोरून वार करा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.

पारनेरच्या स्वाभिमानाचा उल्लेख करत खासदार लंके म्हणाले, हा सेनापती बापटांचा तालुका आहे. झुकणारा, वाकणारा आणि स्वाभिमान विकणारा तालुका नाही. रावणाचे राज्य संपून रामराज्य आले, तसेच पारनेरमध्येही रामराज्य आले आहे. आजवरच्या निवडणुका पाहिल्या तर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे.

नीलेश लंकेचा अंत पाहू नका. दादागिरी आणि दहशत मला शिकवू नका. मी सगळे उकळून पिलो आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला घरी पाठविले आहे. तुमची तयारी असेल तरी पुढच्या वेळीही मीच खासदार होईन. सत्ता आल्यानंतर मंत्री होईन. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. दिवस बदलत असतात, असे सांगत त्यांनी आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिले.

सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर स्टेटस ठेवले तरी गुन्हे दाखल केले जातात, हे दुर्दैवी आहे. मला माणूस ओळखता येतो आणि त्याच्या मनात काय आहे, हेही समजते. मतांसाठी एमबीबीएसच्या प्रवेशाचे आमिष दाखविण्यात आले. आता त्यांनी ते प्रवेश देऊन दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.

निवडणुकीत तालुक्यातील सर्वच पक्षांच्या मतदारांनी आपल्याला मदत केली. विरोधकांसोबत फिरणाऱ्या अनेकांनीही आपल्याला पाठिंबा दिला. मात्र, ज्यांनी मदत केली त्यांची नावे आपण उघड करणार नाही. आपण असेच अंतर्गत एकत्र राहू; परंतु परकी शक्ती तालुक्यात शिरू द्यायची नाही, असे आवाहन त्यांनी केले.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हिशोब चुकता केला जाईल, असा इशाराही खासदार लंके यांनी दिला. या निवडणुकीत पारनेर तालुक्याचा स्वाभिमान जागा झाला असून, सर्वसामान्य जनतेच्या ताकदीची प्रस्थापितांना जाणीव झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. मात्र, ती ठराविक लोकांचा अड्डा बनली आहे. काही कारखानदारांना शेकडो कोटी रुपयांचे कर्ज, अनियमितता, मनमानी आणि हातउसणे पैसे देण्याचे प्रकार सुरू होते. सामान्य शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज मिळावे, गरीब कुटुंबातील मुलांनी उद्योजक आणि व्यावसायिक व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे खासदार लंके म्हणाले.

बँकिंगचा अभ्यास करून रिझर्व्ह बँकेच्या निकषांप्रमाणे कर्जवाटप करावे आणि नियमांनुसार कर्जाची वसुली करावी. ज्यांनी हातउसणे पैसे घेतले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. बँकेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आपण बँकेत गेलो आहोत. बँकेचा कारभार सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हिताचा झाला पाहिजे, हा आपला अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व प्रस्थापित एका बाजूला होते, तर आपण एकटे मैदानात होतो. तरीही मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही याच पद्धतीने नियोजन करून शंभर टक्के विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यातील जनतेने दाखविलेला विश्वास ही केवळ एका निवडणुकीतील विजयाची बाब नसून, सर्वसामान्यांच्या राजकीय सहभागाची आणि स्वाभिमानाची सुरुवात आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार, अशी ग्वाही खासदार नीलेश लंके यांनी विजयी सभेत दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post