कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांची मागणी / आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना शिष्टमंडळ भेटणार / श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांची भावना
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: स्वर्गीय विधान परिषद सदस्य अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर त्यांचे चिरंजीव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप यांना संधी देण्यात यावी अशी जोरदार मागणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी केली आहे.
यासंदर्भात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगर शहरातील समर्थकांचे शिष्टमंडळ लवकरच आमदार संग्राम जगताप यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करणार असल्याची माहिती बाबासाहेब जगताप यांनी दिली.
स्वर्गीय अरुणकाका जगताप यांनी विधान परिषद सदस्य म्हणून नगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना सातत्याने आवाज दिला होता. सहकार, शिक्षण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावी भूमिका बजावत जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आमदार अथवा लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर त्यांच्या वारसाला उमेदवारी देऊन श्रद्धांजली वाहण्याची परंपरा पक्षांकडून पाळली जात असल्याचे बाबासाहेब जगताप यांनी नमूद केले. त्याच धर्तीवर स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सचिनभाऊ जगताप यांना विधान परिषदेवर संधी देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.
सचिनभाऊ जगताप यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विकासकामांवर भर दिला असून युवक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेची संधी मिळाल्यास अरुणकाकांच्या अपूर्ण कामांना गती मिळेल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटासह नगर शहरातूनही सचिनभाऊ जगताप यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वर्गीय अरुणकाका जगताप यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते. त्याचप्रमाणे सचिन भाऊ जगताप यांचाही जनसंपर्क मोठा आहे.
सचिनभाऊ जगताप यांच्याकडे अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच आमदार संग्रामभैया जगताप यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचविणार असल्याची माहिती श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी दिली.
सचिनभाऊ जगताप यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य दिले आहे. युवक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. सामाजिक क्षेत्रातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या कार्याचा वारसा पुढे नेताना त्यांनी कार्यकर्त्यांशी कायम जिव्हाळ्याचे नाते जपले आहे.त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची संधी मिळणे गरजेचे आहे.
बाबासाहेब जगताप (संचालक, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती)


Post a Comment