राज्यात सर्वाधिक मदत मिळवून देणारे लोकप्रतिनिधी
माय नगर वेब टीम
अहमदनगर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मतदारसंघासह राज्यातील गरजू रूग्णांना मदत मिळवून देण्यात राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये खासदार नीलेश लंके हे यंदाही अव्वल ठरले आहेत.
१ जुलै २०२२ ते १ जुलै २०२४ या कालावधीमध्ये खा. नीलेश लंके यांनी विविध आजारांनी त्रस्त असलेल्या १४९ रूग्णांना १ कोटी १५ लाख ७२ हजार रूपयांची मदत मिळवून दिल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाययता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली. गेल्या वर्षीही खा. लंके यांनी विविध रूग्णांना सर्वाधिक मदत मिळवून दिली होती.
सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणाऱ्या खा. लंके यांच्याकडे दररोज विविध प्रकारच्या मदतीसाठी राज्यभरातून लोक येतात. विविध आजारांवरील उपचारासाठी रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आल्यानंतर मदतीसाठी सुरूवातीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा विचार केला जातो. या योजनेमध्ये सबंधित रूग्णाचा आजार बसत नसेल तर विविध धर्मदाय रूग्णालयांशी संपर्क करून त्या रूग्णास वैद्यकिय मदत मिळवून दिली जाते. मतदारसंघाबरोबरच विविध जिल्हयांतून खा. लंके यांच्याकडे लोक मदत मागण्यासाठी येतात. खा. लंके हे त्यांचे सर्व कसब पणाला लावून सबंधित रूग्णास मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
विविध रूग्णांना वैद्यकिय मदत मिळवून देण्यासाठी खा. लंके यांच्या पारनेर येथील संपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून या कक्षाचे प्रमुख अनिल चौधरी हे विविध आजारांचे वर्गीकरण करून ते प्रस्ताव सबंधित विभागाकडे पाठवितात. प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून मदत मंजुर झाल्याची माहीती दिली जाते. संबंधित मदतीची रक्कम थेट त्या त्या रूग्णालयांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येते.
हे तर माझे कर्तव्य
सन २०१९ मध्ये आमदार म्हणून तर सन २०२४ मध्ये खासदार म्हणून मायबाप जनतेने मला निवडूण दिले. ही पदे मिरविण्यासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे माझ्याकडे मदतीसाठी आलेल्या व्यक्तीची, त्याच्या नातेवाईकाची तो कोणत्या पक्षाचा, पार्टीचा अथवा मतदारसंघातील अथवा मतदारसंघाबाहेरील आहे याची कधीही चौकशी केली नाही. माझ्या परीने मी प्रत्येकाला मदत करण्याचा आजवर प्रयत्न केला. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तसेच इतर धर्मदाय रूग्णालयांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रूग्णांना कशी मदत मिळेल याची मी व माझे सहकारी दक्षता घेतात. यापुढील काळातही ही सेवा सुरूच राहील.
खा. नीलेश लंके
Post a Comment