पाडव्याचा मुहूर्त; राज ठाकरेंची मोठी घोषणा! कारण की...



माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचेही आदेश दिले आहेत.


काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही.” असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेणार का? या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “जागावाटपावरही चर्चा झाली. मी खरं सांगू का? मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो ते १९९५ ला. दोन तू घे, ही मला दे.. हे मला जमणार नाही. माझ्याकडून ते होणार नाही” असंही राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे पहिला माणूस होता ज्याने म्हटलं होतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यावेळी त्यांच्या पक्षातलंही कुणी याबद्दल बोललं नव्हतं. मी पाठिंबा दिला. २०१९ पर्यंत पाहिलं की ज्या गोष्टी झाल्या त्या मला पटल्या नाहीत. बुलेट ट्रेन, नोटबंदी सगळे निर्णय घेतले. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याचा मी विरोध दर्शवला. ज्या माणसावर सर्वात विश्वास असतो त्यावेळी विचार करत होतो की देशात अनेक गोष्टी घडू शकता. ज्यांच्यावर प्रेम आणि विश्वास असतो त्याला तडा जातोय हे दिसायला लागलं तेव्हा तो जो राग असतो तो राग आला. माझा राग तर टोकाचा आहे. महाराष्ट्रावर माझं प्रेम आहे ते टोकाचं प्रेम आहे. माझा टोकाचा विरोध लाव रे तो व्हिडीओतून तुम्हाला दिसला. असंही राज ठाकरे म्हणाले.


“नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत. आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला भारत देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी १० वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य हेच तरुण-तरुणी आहेत. प्रत्येक देशाचा एक काळ असतो. जपानमध्ये एक काळ होता. अनेक कंपन्या तिथे उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले. घुसळून निघाला तो देश, असा आपला देश घुसळून निघाला पाहिजे. तसं जर घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल, देशात अराजक येईल” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.


“येणारी लोकसभेची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. आपण खड्ड्यात जाणार की वरती जाणार आहोत. अनेक निवडणुका येतील. विधानसभेच्याही निवडणुका येतील. पण आज हाणामाऱ्या सुरु आहेत. विधानसभेला तर कोथळे बाहेर येतील. मी मागच्या भाषणात बोललो होतो महाराष्ट्रात चुकीचा फुटला आहे. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. मध्यंतरी मी पुण्याला गेलो होतो. तिथे पाचजण राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी म्हटलं कुणाचे? तिघे म्हणाले आम्ही दादांचे, दोघे म्हणाले आम्ही शरद पवारांचे. अशा सगळ्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्राकडूनही माझी अपेक्षा आहे की त्यांनी व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे त्याला राजमान्यता मिळाली तर भीषण दिवस आहेत.”


राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे होतील असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post