अजित पवारांना मोठा झटका, कट्टर आमदाराने सोडली साथ, ठोकला लोकसभेच्या मैदानात शड्डूमाय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : निलेश लंके यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.  निलेश लंके हे  पारनेरचे आमदार आहेत. आमदार निलेश लंके राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करमार अशी चर्चा सुरु होती. अखेर लंके यांनी राजीनामा दिला आहे. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. 


राजीनामा दिल्यानंतर निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. दक्षिण नगरमधून निलेश लंके लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा देखील रंगली आहे. लंके नगरमधून लढल्यास त्यांची लढत सुजय विखेंशी होणार आहे. लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर कारवाई करणार असा इशारा सुनील तटकरेंनी दिला होता. यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंना सूचक इशारा दिला होता. लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असं त्यांनी बजावल होतं. लंकेनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर अजित पवार यांनी हा इशारा दिला होता. 


आपण लोकसभा निवडणूक लढवावी ही जनभावना असल्याचं आमदार निलेश लंके म्हणाले होते. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील त्यांनी ही भूमिका मांडली. लोकसभा लढवावी ही जनतेची इच्छा असली तरीही, लोकांचा सूर जाणून घेऊनच आपण निवडणुकीचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


निलेश लंकेंच्या संभाव्य दक्षिण नगर उमेदवारीवरुन जयंत पाटील-अमोल मिटकरी यांच्यात कलगीतुरा रंगला होता. लंके उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला होता. तर, लंकेंच्या रुपात एका गरीब माणसाचा बळी दिला जातोय..असा टोला अमोल मिटकरींनी लगावला होता. निलेश लंकेंना शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे, त्यावरुनच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कलगीतुरा रंगला होता.


लंके म्हणाले, या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावूक झाले होते. शरद पवार यांच्याबद्दल लंके म्हणाले, मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितले लोकसभा लढवावी लागेल. त्यावर मी लगेच हो म्हणालो. आता शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार आहे, असेही लंके यांनी जाहीर केल.


गेल्या अनेक दिवसांपासून लंके यांची भूमिका ठरत नव्हती. पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढविण्यामध्ये त्यांच्या आमदारकीची अडचण होती. शिवाय राजीनामा दिला तर लगेच पोटनिवडणूक जाहीर होण्याचीही शक्यता होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी अकोला विधानसभा पोटनिवडणूक हायकोर्टाने रद्द केल्याने पारनेरची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता मावळली. त्यामुळे पुन्हा वेगाने हालचाली झाल्या. अखेर लंके यांनी तो निर्णय घेतला, सुपे येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.


राष्ट्रवादीच्या पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यावेळी उपस्थित होते. मेळाव्यात लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. लंके म्हणाले, विखे पाटील पिता-पुत्रांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावले. त्यांचे पीए स्वत:चे पीए ठेवतात आणि पैसे उकळतात. पाच वर्षे खासदार आणि राज्यातील मंत्रिपद असूनही त्यांनी विकास कामे केले नाहीत. एवढ्या काळात एकही वैद्यकीय महाविद्यालय यांनी नगरला आणले नाही. कारण त्यांचे खासगी महाविद्यालय आणि रुग्णालय चांगले चालावे यासाठी ते सरकारी संस्था येऊन देत नाहीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post