अहमदनगर नव्हे अहिल्यानगर! काय म्हणताहेत नगरकर...

 


माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई - अहमदनगर शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्तावाला आज राज्याच्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. 


आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी राज्यभरात गाव आणि शहरांच्या नामांतराचा सपाटा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नाव बदलून ते ‘अहिल्यानगर’ करण्याच्या प्रस्तावाला आज राज्याच्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली.


अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी गेले अनेक दिवस विविध लोकप्रतिनिधी तसेच नागरी संघटनांनी केली होती. अहमदनगर महानगरपालिकेने नाव बदलण्यासंदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवला होता. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून राज्य सरकारने माहिती मागविली होती. या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिकेचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतरण करण्यात येणार आहे. नामांतरणाची प्रक्रिया राज्याच्या महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.


औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर अहमदगरचेही नामांतर

राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर घडत असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यातील औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता अहमदनगर शहराचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.


अहमदनगर जिल्ह्यात आहे अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान

अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला होता. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. काही नोंदीनुसार ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले होते. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यानंतर अहिल्यादेवी या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या.


अहमदनगर शहराचे आत्ताचे नाव हे त्याचे पहिले शासक अहमद निजाम शाह यांच्या नावावरून पडले आहे. अहमद निजाम शाह याने १५९४ साली बहमनी लष्कराविरुद्ध भिंगार या ठिकाणी लढाई जिंकली त्यापासून जवळच अहमदनगर या शहराची स्थापना करण्यात आली होती. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post