आमदार लंके यांनी वाढवली दक्षिणेतील 'हिट'! सोमवारपासून गावागावात 'जनसंवाद'चा धुरळा



 मोहटादेवी गटावरून होणार शुभारंभ

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - अहमदनगर लोकसभा मतदार संघात होणाऱ्या संभाव्य विखे- लंके यांच्या उमेदवारीमुळे अगोदरच गरमागरमी सुरु झाली आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. असे असतानाच आमदारनिलेश लंके गावागावात जाऊन मतदारांशी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधनार आहेत. उषनतेने कहर केला असतानाच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय गरमागरमी पहावयास मिळणार आहे.

आमदार नीलेश लंके यांची एक एप्रिलपासून नगर दक्षिण मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू होणार असून पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून या यात्रेस प्रारंभ होणार आहे. पंधरा दिवसांच्या या जनसंवाद यात्रेत आ. लंके हे मतदारसंघातील नागरीकांशी संवाद साधणार असून नगर शहरातील विशाल गणपती मंदिरात या यात्रेची सांगता होणार आहे.


आ. नीलेश लंके यांनी साधारणतः दोन वर्षांपासून लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू केली असली तर ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणूक लढविण्यासंदर्भात आपण अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत आलेलो नसल्याचे तसेच राजकारणात क्षणाक्षणाला बदल होत असल्याचे ते सातत्याने सांगत आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले असून ते लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत, जामखेड, शेवगांव, राहुरी, नगर या मतदारसंघातील जनतेशी जनसंवाद यात्रेदरम्यान संवाद साधणार आहेत.



दोन महिन्यांपूर्वी आ. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी मतदार संघात शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेस विविध मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आ. राणीताई लंके यांनी त्यावेळी आपण स्वतः लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. आता स्वतः लंके हे मैदानात उतरले आहेत.


तीन दिवसांचा मुक्काम

एका मतदारसंघात सोईनुसार दोन ते तीन दिवसांच्या मुक्कामाचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान आ. लंके हे त्या त्या तालुक्यातच मुक्कामी राहणार असून त्यांच्या समवेतच्या कार्यकर्त्यांचीही तिथेच व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.


विधानसभेपूर्वीही असाच प्रयोग 

शिवसेनेतून हाकलपट्टी झाल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या शाखांच्या माध्यमातून पारनेर-नगर मतदारसंघात संघटन उभे केले. कामोठे, मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात राजकीय निर्णयाबाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली. पुढे मतदारसंघात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येऊन त्यांनी गावागावांतील नागरीकांशी संवाद साधला. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन आ. लंके हे विधानसभेत पोहचले होते.


आ. लंके कायम चर्चेत !

आ. लंके हे राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे ते कायमच चर्चेत असतात. राणीताई लंके यांनी शिस्वराज्य यात्रा काढल्यानंतर आ. लंके यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेने अधिकच उचल खाल्ली. त्यापूर्वीचे दिवाळी फराळ, अलिकडेच पार पडलेले शिवपुत्र संभाजी महानाटय व त्यास मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद, मी अनुभवलेला कोवीड या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने झालेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची चर्चा, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अशा या ना त्या कारणांमुळे आ. लंके हे वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्रांमधून सतत चर्चेत राहिले आहेत.


आज बैठक, सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपवणार 

जनसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजता नगर पुणे महामार्गावरील ग्रीन हेवन मंगल कार्यालयात सुपे येथे आ. लंके यांच्या सहकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या यात्रेच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. आ. लंके यांनी दिवाळी फराळ तसेच शिवस्वराज्य यात्रा तसेच शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रत्येक मतदारसंघांतील गावांमध्ये आमंत्रण पोहचविण्यासाठी सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. जनसंवाद यात्रेच्या नियोजनाची जबाबदारीही संबंधित तालुक्यातील सहकाऱ्यांसह तालुक्यातील सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post