अहमदनगर ब्रेकिंग : दोन मंडळांत तुफान राडापरस्परविरोधी गुन्हे दाखल / तीन जण पोलिसांच्या ताब्यात

माय नगर वेब टीम 

अहमदनगर  : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तरी देखील बुधवारी (दि. २७) रात्री साडेअकरा वाजता मंगलगेट परिसरातील दाणे डाबरा येथे दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अश्लील गाणी वाजवण्यावरून तुंबळ हाणामारी झाली.


दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या मंडळासमोरील बॅनर फाडले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडल्याने हा वाद चिघळला असल्याची माहिती समोर येत आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.


मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर राजू मुर्तोडकर (रा. वंजार गल्ली, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रंजित तरुण मंडळाचे सचिन तुकाराम जाधव, प्रशांत ऊर्फ रॅनबो काळे, वैभव काळे, सुरज काळे, सचिन राऊत, महेश बेद्रे, रोहीत पाथरकर व इतर १० ते १२ यांना 'अश्लील गाणी का वाजवता', अशी विचारणा केल्याने मंडळातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ व दमदाटी करत बॅनर पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


रंजीत तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बापू काळे (रा. मंगलगेट, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सागर मुर्तोडकर, सनी ऊर्फ श्रीकांत मुर्तोडकर, प्रथमेश थोरात, भैया थोरात, विठ्ठल उप्पळकर, सुमित सुरसे, अमित सुरसे, ललीत चवालीया व इतर १० ते १५ जणांना ‘आमच्या मंडळासमोर थांबू नका, तुमच्यामुळे पोलिस आम्हाला देखील मारतील', असे म्हटल्याने सागर मुर्खोंडकर व त्याच्या मित्रांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, सागर मुर्तोंडकर याने बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिन जाधव यांचे बॅनर फाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चौका चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीसुद्धा बुधवारी रात्री दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आदींसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post