निंबळक चौकात होणार 'फ्लायओव्हर' ; सरपंच प्रियंका लामखडे यांचे यश ग्रामस्थ व व्यावसायिकांमध्ये समाधान ; काम सुरू करण्याची मागणी

माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका -नगर तालुक्यातील निंबळक चौकात बायपास रस्त्याच्या कामादरम्यान 'फ्लायओव्हर'  होणार असल्याची माहिती सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिली. येथे फ्लायओव्हर होत असल्याने ग्रामस्थ व व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर बाह्यवळण रस्त्यावर निंबळक चौक येथे भुयारी मार्ग अशी एकूण तीन बॉक्स प्रकारची बांधकामे करारानुसार प्रस्तावित केलेली होती. त्यास निंबळक सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. भुयारी प्रकारच्या कामामुळे येथील भराव व लांबी वाढणार होती. परिणामी परिसरातील व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ निर्माण होणार होती. तसेच परिसरात वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असता. त्यामुळे सदर भुयारी मार्गा ऐवजी  उड्डाणपूल करण्याची मागणी सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामस्थांनी केली होती.       २१ मार्च रोजी भुयारी मार्ग रद्द करून उड्डाणपूल बनविण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगरचे प्रकल्प संचालक  यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनामध्ये भुयारी मार्ग बनविण्यात आल्यानंतर निंबळक ग्रामस्थ व्यावसायिक व कामगारांना येणाऱ्या अडचणीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे येथे भुयारी मार्ग न बनविता उड्डाणपूल बनविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

        निंबळक बायपास चौकात फ्लायओव्हर होणार असल्याने गावाला नवीन ओळख निर्माण होणार आहे. गावाच्या वैभवात भर पडणार असुन  ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीतील कामगार, व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. तरी उड्डाणपूलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी सरपंच प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

         उड्डाणपूल होण्यासाठी दिलेल्या निवेदनावर भानुदास शेळके, जगन्नाथ शिंदे, दत्तू ज-हाड, बाळासाहेब गाडेकर, अलका गाडेकर, शरद आबुज, किसन शिंदे, शामराव मोरे, सय्यद वसीम, विलास पवार, सूर्यभान घोलप, लक्ष्मण होळकर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पगारे ,सोमनाथ खांदवे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने सह्या आहेत. दरम्यान निंबळक चौकात फ्लायओव्हर होणार असल्याने ग्रामस्थ व व्यावसायिकांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

__________________________

निंबळकच्या विकासाला चालना मिळणार !

निंबळक गाव शहरालगत तसेच एमआयडीसी लगत येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहेत. तसेच कंपन्यांमध्ये काम करणा-या कामगारांची संख्या ही मोठी आहे. निंबळकच्या चौकात फ्लायओव्हर झाल्याने गावाला नवीन ओळख निर्माण होणार असून गावच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय तसेच सर्व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच भुयारी मार्ग रद्द होऊन फ्लायओव्हर बनविण्यात येणार आहे.

..... सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post