स्वतःच्या राजकारणासाठी नेप्ती उपबाजार समितीत गुंडागर्दी

 


नेप्ती उपबाजार समितीतील आडते-व्यापाऱ्यांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र - नंदकिशोर शिखरे

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीने राज्यात कांद्याला उच्चकी बाजार देऊन राज्यभर नावलौकिक मिळवला आहे परंतु काही विघ्नसंतोषी लोक नेप्ती उपबाजार समितीमध्ये येऊन गोंधळ घालून गुंडागर्दी करण्याचे काम करत आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. स्वतःच्या राजकारणासाठी जे कोणी उपबाजार समितीची व अडते व्यापाऱ्यांची बदनामी करत आहेत त्यांनी ही बदनामी त्वरित थांबवावी असा इशारा कांदा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिखरे यांनी दिला आहे.

       माजी सभापती भानुदास कोतकर यांनी व्यापार विषयक दूरदृष्टी ठेवून नगर बाजार समितीमध्ये वाढत्या प्रमाणात कांद्याची आवक लक्षात घेता, कांदा आवक उतरविण्यासाठी भविष्यात अडचण निर्माण होवू नये म्हणून, नेप्ती उपबाजार समितीची भव्य वास्तू निर्माण केली. तेथे शेतकरी, आडते, व्यापारी व बाजार समितीतील घटक या सर्वांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. नेप्ती उपबाजार समितीमध्ये सुरुवातीपासून (२०११) ते आजपर्यंत (२०२२) पर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून नगर तालुक्यातील तसेच शेजारील जिल्यातील शेतकरी वर्गाच्या विश्वासास येथील आडते-व्यापारी पात्र ठरले आहेत, त्यामुळेच नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे व ती दिवसेंदिवस वाढतच आहे. नेप्ती उपबाजार समितीमधील पारदर्शक व्यवहारामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा विक्रीस आणत आहे.

        नेप्ती उपबाजार समितीमधून संपूर्ण भारतात तसेच परदेशातही कांद्याची निर्यात केली जाते, भारतातील सर्व राज्यातील व्यापारी आपल्या मागणीप्रमाणे येथील आडते-व्यापार्यांकडून माल खरेदी करतात, त्यासाठी कोणत्याही व्यापार्यास कोणतेही बंधन नाही. नेप्ती उपबाजार समितीमध्ये प्रतवारीनुसार कांद्याचे लिलाव होत असतात, नेप्ती उपबाजार समितीचा नावलौकिक अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच स्पर्धेला उत्तेजन देत, शेतकऱ्यांच्या मालाला कमाल भाव दिला जातो, कोणताही आडते-व्यापारी भाव पडण्याचे काम करत नाही. शेतकरी हिताचे आव आणणारे काही संबंधित घटक हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी, अज्ञान शेतकरी व विघ्नसंतोषी व्यक्तींना हाताशी धरून नेप्ती उपबाजार समितीत गोंधळ निर्माण करीत आहेत. नेप्ती उपबाजार समिती मध्ये शेतकऱ्यांच्या मालाचे योग्य मूल्यमापन करणाऱ्या आडते-व्यापाऱ्यांची बदनामी करत आहेत. तरी संबंधित घटकांनी कांदा व्यापार विषयक योग्य ती माहिती घेऊन नंतरच आपले मत व्यक्त करावे. त्यांना जर खरच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून न्याय मिळावा असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतः लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करावा व शेतकरी हिताचे रक्षण करावे असे मत नंदकिशोर काशिनाथ शिकरे यांनी व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post