यंदाच्या पावसाळ्यात आहारातील ‘या’ ५ चुका टाळाच!

 


हेल्थ डेस्क | कडक उन्हाळ्याच्या दिवसांनंतर पावसाच्या थंडगार सरी सुखावणाऱ्याच असतात. मात्र, जितकं हे पावसाळी वातावरण सुखावणारं आणि आल्हाददायक असतं तितकीच जास्त आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं. या ऋतूत आजारी पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणूनच, प्रकृतीची गंभीर समस्या उदभवू नये यासाठी आपल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा. त्याचसोबत आपल्याकडून आहारविषयक होणाऱ्या काही चुका देखील टाळायला हव्यात. फिटेलोचे संस्थापक आहारतज्ज्ञ मॅक सिंग यांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ५ चुका टाळायलाच हव्या. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नेमकं काय टाळायचं? आणि काय खायचं? जाणून घ्या

१) सायट्रिक फळं

सायट्रिक फळं ही ‘व्हिटॅमिन-सी’चा उत्तम स्त्रोत असतात. व्हिटॅमिन सी आपल्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे. कारण ती आपल्याला होणाऱ्या संसर्गाशी लढा देते, जी आज काळाची गरज आहे. पण, या फळांच्या आंबटपणामुळे लोक ती खाण्याचा कंटाळा करतात. जी प्रतिकारशक्तीशी तडजोड आहे. पण जर तुम्हाला सायट्रिक फळं आवडत नसतील, तर तुम्ही नेहमी तुमच्या जेवणातील काही पदार्थांवर लिंबू पिळू शकता किंवा लिंबूपाणी बनवू शकता. त्याचसोबत तुम्ही पपई, पेरू आणि भोपळी मिरची यासारख्या ‘व्हिटॅमिन-सी’युक्त पदार्थांचं सेवन जरूर करा.

२) प्रीबायोटिक-प्रोबायोटिक पदार्थ

सायट्रिक फळांप्रमाणेच लोक बर्‍याचदा दह्यासारखा प्रोबायोटिक पदार्थ टाळताना दिसतात. पावसाळ्यात तुमच्या आतड्यांना योग्य ठरेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल असा आहार घेण्याची खात्री करणं आवश्यक आहे. दही, ताक हे पदार्थ तुमच्या आतड्यांना जंतू आणि इतर हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत करतात.

३) फ्रिजमधील पाणी

पावसाळयात जर तुम्हाला तुमचा घसा चांगला ठेवायचा असेल तर सर्वात आधी फ्रिजचं पाणी टाळायचं आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कि, थंड पाणी आपल्या घशाला हानी पोहोचवते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढवतं. पण जर तुम्हाला थंड पाणी सोडणं कठीण वाटत असेल तर सुरुवातीला आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे माठातलं पाणी पिण्यास सुरुवात करा. हे पाणी केवळ तुमची तहानच भागवणार नाही, तर चयापचय वाढवण्यापासून, हार्मोन्स संतुलन आणि सन स्ट्रोक रोखण्यापर्यंतचे अनेक फायदे देईल.

४) हंगामी फळं आणि भाज्या

हंगामी फळं आणि भाज्या खाण्यावर भर देण्याचं कारण असं आहे की, विविध ऋतूंमध्ये आपल्या प्रदेशात पिकलेली जी फळं आणि भाज्या असतात त्या आपल्या शरीराला अनेक फायदे देतात. दुसरीकडे आयात फळं आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या भाज्या यांपासून आपलं शरीर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह अन्य अनेक फायद्यांना मुकतं.

५) रस्त्यावरील खाद्यपदार्थ

पावसाळ्यात आपल्याकडे तळलेले पदार्थ उदा. चहा आणि भाजी, बटाटे वड्यांचा बेत तर हमखास असतो. मात्र, रस्त्यावरील तळलेल्या पदार्थांमुळे ब्लोटिंग आणि पोट खराब होण्यासह अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, या दिवसांत रस्त्यावरील तळलेले पदार्थ खाणं टाळा. तसेच पावसाळ्यात आपल्याला तहान लागत नाही. फार पाणी पिणं होत नाही. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. म्हणून तुम्ही दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पित आहात ना, याची खात्री करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post