विदेश डब्ल्यूटीसी : भारत पाच गोलंदाजांसह खेळणार?


स्पोर्ट्स डेस्क - आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा जवळपास संघ निश्चित केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यात तीन वेगवान तसेच दोन फिरकीपटूंचा समावेश असेल.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेआधी कोहली आणि सहकाऱ्यांना सराव सामना खेळायला मिळालेला नाही. त्यामुळे आंतरसंघ म्हणजे उपलब्ध क्रिकेटपटूंमध्ये दोन संघ खेळवून भारताने सराव केला. त्यात रिषभ पंत, लोकेश राहुल, शुबमन गिल व रोहित शर्माने फलंदाजीचा सराव केला. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा संघ चार जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरेल अशी शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात येत होती, परंतु, तीन जलदगती तसेच दोन स्पिनर असे समीकरण असण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असल्या तरी भारतीय संघ त्यांच्या मजबूत बाजूसह म्हणजेच फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजा व अनुभवी ऑफस्पिनर आर.अश्विन यांची निवड पक्की मानली जात आहे. वेगवान गोलंदाजांसाठी जसप्रीत बुमरा व मोहम्मद शमी यांची निवड पक्की मानली जात आहे. तिसऱ्या जागेसाठी इशांत शर्मा, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस आहे.. अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी जलदगती व फिरकी गोलंदाजीला (स्पोर्टिंग) पूरक असेल, असे क्युरेटर्सनी सांगितले आहे. पहिल्या तीन दिवसांत जलदगती गोलंदाजांचे वर्चस्व असेल, तर उर्वरित दोन दिवशी फिरकी गोलंदाज कमाल दाखवतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post